मुंबई आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत, कोणत्या जिल्हयांना आहे ऑरेंज अलर्ट
By सचिन लुंगसे | Published: July 5, 2024 07:29 PM2024-07-05T19:29:48+5:302024-07-05T19:30:08+5:30
Mumbai Rain Update: राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या धारा बरसत असतानाच जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी मुंबई अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईकरांना घामाच्या धारांनी नकोसे केले असून, शुक्रवारी मुंबई दिवसभर ढगाळ असतानाही पावसाने मुंबईकरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या धारा बरसत असतानाच जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी मुंबई अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईकरांना घामाच्या धारांनी नकोसे केले असून, शुक्रवारी मुंबई दिवसभर ढगाळ असतानाही पावसाने मुंबईकरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्हयाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जुन महिन्यात पडलेली एखाद दुसरी सर वगळता हा महिना ब-यापैकी कोरडा गेला. जुलै महिन्यातही सुरुवातीला पाऊस अपेक्षित असताना हवामानात झालेल्या बदलामुळे आजही मुंबईत पुरेसा पाऊस झालेला नाही. शुक्रवारी सकाळी दिवसभर मुंबई ढगाळ होतील. सर्वत्र काळोख दाटून आला होता. त्यामुळे मुसळधार पावसाचा तडाखा बसेल, असे वातावरण होते. प्रत्यक्षात मात्र एखादी पडलेली सर वगळता संपुर्ण दिवस कोरडा गेला.
रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी सातारा जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा वगळता १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तेथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा करता येईल.