थंड हवेचे ठिकाण आपली मुंबई..., सलग दुसऱ्या दिवशी १५ अंश तापमान, माथेरानचे १८
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 07:41 AM2023-01-03T07:41:11+5:302023-01-03T07:41:59+5:30
दुसरीकडे राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई : राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानाचा पारा किंचित अधिक असला तरी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर स्थिर आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ अंश एवढे असल्याने मुंबईकरांना सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान हे १४ - १५ तर कमाल तापमान हे २६ - २९ दरम्यान असून, ही दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतानाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक आहे. हा प्रभाव उत्तर भारतातून राजस्थान, गुजरातमार्गे कोकणात उतरत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव हा आहेच. मात्र तुलनेने काहीसा कमी आहे. पुढील ५ दिवस थंडीचा हा प्रभाव कायम राहील, अशी माहिती निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
थंडी वाढणार
खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावलेले आहे. येथेही काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते.
अपेक्षित थंडी नाही
उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा
अधिक असून, अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरी येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.