लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जगातील प्रमुख महागड्या ४४ शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे. या यादीत सातत्याने फिलिपीन्सची राजधानी असलेले मनिला शहर अव्वल क्रमांकावर आहे.
जगातील या प्रमुख शहरांत वर्षभरात किती किमती वाढल्या याचा अभ्यास करून त्याची क्रमवारी निश्चित केली जाते. मुंबई शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीमध्ये १३ टक्के, तर दिल्ली शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीत १०.६ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
गेल्यावर्षी या क्रमवारीत मुंबई सहाव्या क्रमांकावर होती, तर दिल्ली शहर या क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर होते. बंगळुरू शहरात गेल्या वर्षभरात ३.७ टक्के दरवाढ झाली असून, जागतिक क्रमवारीत बंगळुरू १५ व्या क्रमांकावर आले आहे.
१) गेल्या दीड वर्षात मुंबई शहर व महामुंबई परिसरात दोन लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. या घरांच्या एकूण विक्रीत ४२ टक्के वाटा हा आलिशान घरांचा आहे.
२) एक ते पाच कोटी रुपये किंमत असलेल्या घरांची यामध्ये संख्या जास्त असली तरी पाच ते १० कोटी रुपये किंवा १० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या घरांच्या विक्रीचा वाटाही लक्षणीय आहे.
३) गेल्या वर्षी मुंबईत १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या घरांची झालेली विक्री चर्चेचा विषय ठरली होती.
४) आजच्या घडीला मुंबईत सध्या किमान १,१०८ चौरस फुटांचे आलिशान घर विकत घ्यायचे असेल, तर त्याकरिता किमान आठ कोटी २४ लाख रुपये मोजावे लागतात.
५) एवढ्याच पैशांत जर दिल्लीत घर घ्यायचे असेल तर दिल्लीत किमान २,३३५ चौरस फुटांचे आलिशान घर मिळू शकते.
मनिलातील जागांच्या किमतीत २६ टक्क्यांची वाढ-
जागतिक क्रमावारीत मनिला शहर अव्वल क्रमांकावर असून तेथे वर्षभरात जागांच्या किमतीत २६ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर या यादीत अमेरिकेतील लॉस एन्जेलिस शहर चौथ्या क्रमांकावर आहे.