मुंबई - मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. विशेषत: शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरासह उपनगरात पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. महत्त्वाचे म्हणजे, या १५ तासांत महापालिकेच्या ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.रविवारी दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात हिंदमाता, परळ टी.टी., गांधी मार्केट, सायन येथील मुख्याध्यापक भवन, सायन रोड क्रमांक २४, सायन येथील हेमंत मांजरेकर मार्ग, अँटॉप हिल येथे पाणी साचले होते. पूर्व उपनगरात चेंबूर येथील शेल कॉलनी आणि पोस्टल कॉलनी, कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार आणि काळे रोड, एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा परिसरात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, बीकेसीमधील कपाडियानगर येथे पाणी साचले होते.मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. परिणामी, सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचे विशेषत: बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले होते. यात किंग्ज सर्कल, वडाळा, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, घाटकोपर येथील नित्यानंदनगर, सायन, साकीनाका, चेंबूर नाका, मिलन सबवे, हिंदमाता फ्लायओव्हर, अमर महल जंक्शन, पवई, मुलुंड, वांद्रे येथील लिकिंग रोड, वडाळा येथील अँटॉप हिल येथील ठिकाणांचा समावेश होता.मुंबई शहरात ४, पूर्व उपनगरात ५, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. रविवारी दुपारी ३च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील हलाव पूल येथील भूषण भवन या तळमजला अधिक तीन माळ्यांच्या बाल्कनीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी मदत यंत्रणा कार्यान्वित आहे.मध्य रेल्वे आणि महानगर पालिकेच्या अधिकारी वर्गाने एकत्रितरीत्या नित्यानंदनगर ते श्रेयस जंक्शन (एलबीएस मार्ग) घाटकोपर (पूर्व-पश्चिमेस जोडणारा पूल) येथील झुकलेल्या पुलाची एकत्रितरीत्या घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. सुरक्षेच्या कारणात्सव पुलास लागून असलेला पदपथ (फुटपाथ) बंद ठेवण्यात आला आहे, असे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.१११ ठिकाणी उदंचन संच सुरूमुंबई शहर आणि उपनगरात १११ ठिकाणी उदंचन संच सुरू करण्यात आले होते. मुख्य६ उदंचन केंद्रांतील १८ संच वापरण्यात आले. सर्व यंत्रणा कार्यान्वित होती. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विभागीय सहायक आयुक्तांना आपापल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.मुंबईत पडलेला पाऊस (मिमी)फोर्ट-१८७, कुलाबा-१६७, शिवडी-१५८, कुर्ला-१३७, घाटकोपर १३२, मरोळ-१६१, वर्सोवा-१३१, बीकेसी-१२६, सांताक्रुझ-१३१, भायखळा-१५५, वरळी-१४१, मरोळ -१६०.६९, अंधेरी-११८, मालवणी-१२३, कांदिवली-१००, मालाड-१०२, विलेपार्ले-१०१
मुंबईत १५ तासांत पडला १५० मिलीमीटर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:19 AM