लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या केईएम रुग्णालयात गुरुवारी ॲनस्थेशिया इंटेन्सिव्ह केअर युनिट (एआयसीयू)च्या नवीन विभागाचे लोकार्पण करण्यात आले. याखेरीस, लहानग्यांच्या विभागाचेही रूपडे पालटले असून यात आता हाडांच्या समस्यांवर उपचार करणारे युनिट सुरू झाले आहे.
रुग्णालयातील लहान मुलांच्या विभागात नव्याने सात खाटा तर इंटेन्सिव्ह युनिटमध्ये १४ नव्या खाटांची भर पडली आहे. यापूर्वी, दोन हजारांहून अधिक खाटांची क्षमता असलेल्या केईएममध्ये एनएचसी विभागासाठी वेगळे इंटेन्सिव्ह केअर युनिट नव्हते, त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना लक्ष ठेवणे अवघड होते. इंटेन्सिव्ह युनिटमध्ये वयोवृद्ध, आजारी डायबिटीस, दमा यासारखे आजार असणाऱ्यांवर तातडीने उपचार करणे शक्य नसते, त्यामुळे अशा रुग्णांना मॉनिटरिंग करण्यासाठी म्हणजे देखरेखीखाली ठेवण्यासाठी या विभागाचा उपयोग होणार आहे. या विभागात काही परिचारिकांचीही बाहेरून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेन ओटी सुरू करण्यात आली आहे, यामुळे नसा, मणका कर्करोगासह शस्त्रक्रिया करण्याची गरज नसणाऱ्या रुग्णांचा उपचार आणि तपासण्या या ठिकाणी होणार आहेत. या सुविधांमुळे रुग्णांची मोठी सोय होणार असून चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
दमा असलेल्या लहानग्यांवरही उपचार
केईएम रुग्णालयात असणारी इमर्जन्सी पीडियाट्रिक रूम कोविड काळात कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येत होती. त्यामुळे सतरा व अठरा वॉर्डमध्ये काही प्रमाणात लहान मुलांना उपचारासाठी न्यावे लागत होते, मात्र पुन्हा नव्याने सुरू झालेल्या इमर्जन्सी पीडियाट्रिक रूममुळे आता लहानग्यांच्या अडचणी सुटणार असून यात चार इपीआर बेड आणि व्हेंटिलेटरसह सुविधा आहेत. त्याशिवाय दमा असणाऱ्या मुलांना वाफेची सुविधाही दिली असून गरजेनुसार उपचार देऊन घरी सोडण्यात येणार आहे.