Join us

हळदीच्या मंडपात विजेच्या शॉक लागल्यानं चिमुरड्याचा मृत्यू, तर दोघे बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 1:32 PM

मालवणीच्या एमएचबी कॉलनीतील प्रकार, तपासासाठी घेणार पीडब्लूडीच्या अभियंत्याची मदत 

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: मालवणी परिसरात सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या मंडपात शॉक लागून रमजान इस्माईल (७) नामक मुलाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन मुलांना स्थानिकांनी वाचविले. गेल्या बुधवारी हा प्रकार घडसा असून त्याने मीटर बॉक्सला हात लावल्याने हा अपघात घडल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र यात चूक नेमकी कोणाची याची माहिती घेण्यासाठी पोलीस सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी विभाग) मदत घेत आहेत. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच बी कॉलनी येथील दादाजी गायकवाड नगरच्या चाळ क्रमांक ११४ मध्ये रमजान कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याठिकाणी १८ मे रोजी नादिर मंडपवाला नामक व्यक्तीच्या भाच्याची हळद होती. ज्या कार्यक्रमासाठी मंडप बांधण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात जी रोषणाई करण्यात आली होती त्याला मीटर बॉक्समधून आकडा टाकत वीजपुरवठा करण्यात आला होता. ज्याची वायर ही मंडपाच्या लोखंडी खांबांना स्पर्श करून जात होती. त्याच परिसरात रमजान हा त्याच्या अन्य मित्रांसोबत खेळत असताना त्याचा हात त्या खांबाला लागला आणि विजेचा जोरदार झटका त्याला लागून तो जागीच कोसळला. 

स्थानिकांनी हे पाहिल्यावर लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मुख्य म्हणजे त्यावेळी रमजान सोबत त्याठिकाणी अन्य लहान मुले नव्हती अथवा हा ठिकाणी खुप मोठा अपघात घडला असता अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली. एका खासगी वीज कंपनीकडून केबल टाकण्यासाठी या परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रमजानच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याच्या घरच्यांना या प्रकारामुळे जबर धक्का बसला असून ते काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाहीत. सदर घटना घडली त्यात नेमकी कोणाची चुक आहे? याबाबत तपास करण्यासाठी आम्ही पीडब्लूडीच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला पत्र लिहून पडताळणी करण्यासाठी बोलावले आहे. तसंच नेमका हा प्रकार कसा घडला याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच यात निष्काळजीपणा आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :मुंबई