Mumbai: 'त्या' आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्यांचे पोलीस आयुक्तांना पत्र
By मनीषा म्हात्रे | Published: July 18, 2023 03:08 PM2023-07-18T15:08:10+5:302023-07-18T15:08:36+5:30
Kirit Somaiya: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून या व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू आहे. यामध्ये जवळपास ८ तासांच्या ३५ व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका मराठी वृत्तवाहिनीवर एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. तसेच, अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेले नाही असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची, तसेच व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.
एका आलिशान हॉटेल मधील हे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओ मागचे सत्य शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सायबर पोलीस याप्रकरणी समांतर तपास करत आहे.