मुंबई : एकीकडे एसटीने दरवाढ केली असताना मुंबई - कोकण मार्गावरील खासगी बसप्रवासही २० टक्क्यांनी महागला आहे. इंधन दर आणि खड्ड्यांमुळे वाढलेला दुरुस्ती खर्च भाडेवाढीस कारणीभूत असल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सलग सुट्ट्या आणि सणासुदीचा काळवगळता हे दर कायमस्वरूपी लागू राहतील.
मुंबई - कोकण मार्गावर ये-जा करणाऱ्या ट्रॅव्हल्सचालक - मालकांची बैठक नुकतीच पार पडली. यात भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. दिवसेंदिवस वाढत जाणारे डिझेलचे दर, खड्डेमय रस्त्यांमुळे सतत वाढणारा दुरुस्ती खर्च आणि वारंवार बदलत राहणारे वाहतुकीचे नियम पाहता व्यवसाय करणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दरवाढ हा एकमेव उपाय असल्याचे मत बहुतांश सदस्यांनी मांडले. चर्चेअंती किमान भाडेदरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्यावसायिक म्हणतात..- कमाईपेक्षा खर्च वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच गाड्या बंद आहेत. सुरू असलेल्या गाड्या बंद कराव्या लागतील, अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे भाडेवाढ करावी लागली.
- एसटीच्या दीडपट भाडे घेण्यास परिवहन विभागाची मान्यता आहे. पण, आमचे दर एसटीपेक्षाही कमी आहेत. याउलट त्यांच्यापेक्षा अतिरिक्त सुविधा आम्ही देतो.
- त्यांच्या गाड्या निमआराम प्रकारातील असतात तर ट्रॅव्हल्सची रचना पुश-बॅक, शययान, वातानुकूलित प्रकारची असते.
- नवे दर हे प्रवासी आणि व्यावसायिकांना परवडतील अशाप्रकारे ठरविण्यात आल्याची माहिती ट्रॅव्हल्सचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अरविंद पाटील यांनी दिली.
जादा पैसे का द्यायचे?
सणासुदीला खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर कोणाचाही लगाम नसतो. ८०० रुपयांचे तिकीट १८०० ते दोन हजारांना विकले जाते. उपरोक्त नियम त्यावेळी का लागू केला जात नाही? खासगी बससाठी कमाल भाडेदर निश्चित करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा हे सर्वसामान्यांची लूट थांबविणार नाहीत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई या प्रवाशाने दिली.
एप्रिल, मे, गणेश चतुर्थी तसेच लागून येणाऱ्या सरकारी रजा, यात्रा कालावधीवगळता हे दर लागू राहतील. प्रवास हंगामात तत्कालीन प्रतिसादानुसार दरपत्रक ठरविले जाणार आहे. त्यामुळे या भाडेवाढीव्यतिरिक्त सणासुदीला अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, उपरोक्त तिकीट दर सर्व बसमालकांसाठी बंधनकारक राहतील. कोणीही जुन्या दरांनुसार तिकीट विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित बसमालक आणि एजंटवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
किमान भाडेदर असे -ठिकाण बोरिवली/ ठाणे/ परेलहून विरारहूनबांदा, कुडाळ, कसाल ७५० ८५०कणकवली, नांदगाव, तरळा, खारेपाटण ७०० ८००मालवण, चौके, कट्टा १००० ११००कोळंब आचरामार्गे कणकवली ९०० १०००आचरा देवगड मार्गे नांदगाव १००० ११००कोंड्ये, हातिवले, राजापूर आणि वाळ, ६५० ७५०लांजा, पालीहातखंबा, संगमेश्वर, आरवली, चिपळूण ६०० ७००