मुंबई, दि. 19 - मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. याशिवाय, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा पाणी साचल्यामुळे विमानसेवेवरही याचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर पाणी साचाल्यामुळे आणि खराब हवामानामुळे अद्याप एकाही विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे सांगण्यात येते. तसेच, चार विमाने वळविण्यात आली असल्याची माहिती सीएसआयएच्या अधिका-यांकडून मिळते. दरम्यान, दुसरीकडे हार्बर, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरा सुरु आहे. त्यामुळे याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, लोअर परेल,वांद्रे रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांनी गर्दी केली आहे.
उपनगरातील बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ,माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. याचबरोबर, येत्या 15 तासांमध्ये शहरातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.