Join us

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 6:32 PM

जखमींचे उपचारही शासकीय खर्चाने; मुख्यमंत्री कार्यलयातून ट्विटद्वारे माहिती 

Kurla Building collapse: पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबईतीलकुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही ४ मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. या घटनेत अंदाजे १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

कुर्ल्यातील इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर, घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांची तुकडी तातडीने पोहोचली. या दुर्घटनेत सुरूवातील मृतांची संख्या कमी होती. मात्र नंतर काही जणांचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने व उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संबंधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले. 'मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत', अशी माहिती ट्विट करून देण्यात आली.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजल्यावर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री २ वाजता घटनास्थळाला भेट दिली. कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवानांनी १३ जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले. अद्यापही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :कुर्लाउद्धव ठाकरेमुंबईमहाराष्ट्र