पेइंग गेस्ट मुलींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या घरमालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 11:55 IST2018-12-25T10:48:32+5:302018-12-25T11:55:08+5:30
पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींचे चोरून चित्रीकरण करणाऱ्या घरमालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात ही घडली आहे. याप्रकरणी डीबी रोड पोलीस ठाण्यात पीडित मुलींनी तक्रार दाखल केली आहे.

पेइंग गेस्ट मुलींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या घरमालकाला अटक
मुंबई - मुंबई कामानिमित्त येणारी अनेक मंडळी राहण्यासाठी पेइंग गेस्टचा पर्याय निवडतात. मात्र पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींना सावध करणारी एक घटना समोर आली आहे. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींचे चोरून चित्रीकरण करणाऱ्या घरमालकाला मुंबई पोलिसांनीअटक केली आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात ही घडली आहे. याप्रकरणी डीबी रोड पोलीस ठाण्यात पीडित मुलींनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुली वर्षभरापासून पेइंग गेस्ट म्हणून राहात होत्या. आरोपी घरमालक अविवाहित असून त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. काही दिवसांपासून मुलींची वाक्य घरमालक त्यांच्याच स्वरात त्यांना ऐकवत होता. मुली आपापसात बोलत असताना अन्य कोणी त्याठिकाणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे मुलींना घरमालक चोरून आपले संभाषण ऐकत असावा असं वाटलं. त्यामुळे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पण या तीनपैकी एका मुलीला एक दिवस खोलीत अॅडप्टर सापडला. तिला याबाबत संशय आल्याने तिने या अॅडप्टरवर कपडा टाकला. त्यानंतर घरमालक खोलीत आला आणि त्याने मुलींना तो कपडा काढायला सांगितला.
घरमालकाचं असं वागणं पाहून मुलींना त्याचा संशय आला. त्यांनी अॅडप्टरचे फोटो काढले आणि इंटरनेटवर सर्च केलं त्यावेळी छुपा कॅमेरा असल्याचे समोर आले. मुलींनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत याबबात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरमालकाच्या घरातील अॅडप्टरमधला कॅमेरा शोधून काढला आणि तो अॅडप्टर जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी घरमालकाला अटक करण्यात आली आहे.