मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये राज्यभरात उमटलेल्या सत्ता संघर्षानंतर मुंबई महापालिकेतही जोरदार घमासान पाहण्यास मिळाले. यानिमित्ताने पुन्हा या गटातून त्या गटात जाण्यासाठी राजकीय लगबग सुरू झाली. मात्र, या सत्ता संघर्षाच्या हव्यासात मुंबईच्या नागरी प्रश्नांसोबत विकासाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.
सत्तेसाठी दोन हात करणारे राजकीय प्रतिनिधी मुंबईच्या नागरी आणि विकासाच्या मुद्यावर जोरदार भांडताना कधी दिसले नाहीत. परिणामी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा, झोपड्यांच्या पुनर्विकासाचा, चांगल्या रस्त्यांचा, नदी शुद्धीकरणाचा प्रश्न कायमच आ-वासून उभा असून, केवळ निवडणुकांच्या तोंडावर या प्रश्नांचा विसर पडलेला असतो.
विकास आराखडामुंबईचा विकास आराखडा हा तळापासून वर या संरचनेवर आधारित असला पाहिजे. म्हणजे स्थानिक क्षेत्र विकासाला मुंबई विकास आराखड्यात प्राधान्य असायला हवे. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत निर्णायक सहभाग वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी कधीच आवाज उठविलेला नाही.
मुंबईची तुंबई पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या शहरात बसविण्यात आल्या आहेत. मात्र, या जलवाहिन्यांची पुरती दुरवस्था झाली असून, पाणी तुंबायचे ते तुंबतेच. या प्रश्नाबाबत राजकारण्यांकडून कोणताही आवाज उठविला जात नाही. मुंबईची रचना बशीसारखी असल्याने भरतीवेळी पाणी तुंबते, असे कारण सोयीनुसार पुढे केले जाते.
श्वास कोंडलादक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई परिसराचा विचार करता भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ आणि लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामे सुरू आहेत.काही ठिकाणी पुनर्विकासांतर्गत जुन्या इमारती, चाळी पाडल्या जात आहेत, तर काही ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत. नेमके याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य-दक्षिण मुंबई सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहे.
डम्पिंग आहे की मृत्यूचे द्वारदेवनार, गोवंडी, मानखुर्द या वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक अक्षरशः नाक दाबून राहतात. डम्पिंगमुळे जे प्रदूषण होते ते प्रदूषण कमी करण्यासाठी एकही राजकीय पक्ष सातत्याने या विषयावर आवाज उठत नाही.
रस्ता रुंदीकरण कधी?मुंबई, ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गसोबत अंधेरी, कुर्ला या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या रस्ते रुंदी करण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून पडून आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान वस्ती स्थलांतरित होईल आणि आपले मतदार कमी होतील, या भीतीपोटी या प्रश्नावर एकही राजकीय नेता बोलण्यास तयार नाही.
रस्त्यांची केवळ डागडुजीपावसाळा आला की रस्त्यांची मलमपट्टी करत यावर कोट्यवधी रुपयांची उधळण करणारे पालिका प्रशासन नंतरचे आठ महिने रस्त्यांकडे दुर्लक्ष करते. पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर त्या खड्ड्यात उतरून फोटोसेशन करणारे लोकप्रतिनिधी रस्ता चांगला व्हावा म्हणून निधी आणण्यासाठी फार कमी वेळेला धडपडताना दिसतात.
फनेल झोनमुंबईच्या उपनगरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला ज्या झोपड्या वसल्या आहेत; त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. विमानतळालगतच्या फनेल झोनमध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या पुनर्विकासाकडे राजकीय पक्षांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही.
दरडीचा धोकामुंबईतील अनेक डोंगराळ भागात नागरिकांची पावसाळ्याच्या दिवसांत मृत्यूशी रोजची झुंज सुरू असते. कारण मुंबई हे टेकड्यांचे शहर असून, पूर्वीच्या स्थायिकांनी निवास करण्याच्या उद्देशाने काही टेकड्या विकसित केल्या आहेत. लोकसंख्येच्या स्फोटामुळे झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता टेकड्यांवर वसलेले आहे. महापालिकेने आपत्ती प्रवण क्षेत्रे रिकामी करण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी काहीही केले नाही. कोणतीही राखीव संरचना बांधली नाही.
नदीचे प्रदूषण मानवी वस्तीतदहिसर, ओशिवरा, पोईसरसह मिठी नदीतून पाण्यासोबत शेणही वाहत असल्याने नद्या उत्तरोतर प्रदूषित होत आहेत. या प्रदूषणाचा फटका नदीलगतच्या शाळांसोबत मानवी वस्तीला बसत असून, त्यातून अस्वच्छता आणि डासांची पैदास होत आहे. त्यामुळे आरोग्य आणखीनच धोक्यात आले आहे. मात्र या प्रश्नावर नगरसेवकही काही बोलण्यास तयार नाहीत.
पाणी कधी मिळणार?मुंबईच्या पूर्व उपनगरात गोवंडी आणि मानखुर्द येथे राहणाऱ्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी करावी लागते. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून नगरसेवक कधीच मैदानात उतरले नाहीत. मालाड आणि मालवणी येथेही हीच परिस्थिती आहे.
फुटपाथ मोकळे करामुंबईच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जातो. मात्र, मुंबई शहरासोबत उपनगरात फुटपाथ अनधिकृतरित्या काबिज करण्यात आले आहेत. हे फुटपाथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने कित्येक वेळा कारवाई केली. पण मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी फुटपाथला मोकळा श्वास घेऊ दिलाच नाही.
कोणाचा विकास, कुठे अडला?उद्धव ठाकरे गट गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना महापालिकेत सत्तेवर आहे. मात्र, सर्वांसाठी पाणी हे धोरण आणूनही शिवसेनेला मुंबईच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे अधिकार मिळवून देता आलेले नाहीत.
समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीसारखा पक्ष मुंबईच्या पूर्व उपनगरात कित्येक वर्षांपासून सत्तेवर आहे. मात्र, त्यांना झोपड्यांतल्या आरोग्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने विरोधी बाकावर बसूनही मुंबईच्या विकासाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी पुरेसा आवाज उठविलेला नाही. त्यामुळे विकासासाठी या पक्षांना ठोस भूमिका मांडावी लागेल.
मनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणूस आणि मुंबईचा विकास या दोन विषयांवर सातत्याने लक्ष केंद्रीत केले असले तरी त्यांची राजकीय पकड घट्ट नसल्याने मुद्दा मुद्दाच राहिला आहे.
भाजपउद्धव ठाकरे गटाला पाण्यात पाहण्यापलीकडे भाजपने मुंबईत विकासाच्या मुद्द्याला म्हणावा तसा हात घातला नाही. झगमगाट म्हणजे मुंबईचा विकास नाही तर मुंबईतल्या नागरी प्रश्नांचा निपटारा झाला पाहिजे; याकडे मुंबईकर सातत्याने लक्ष वेधत आहेत.