- गौरी टेंबकरमुंबई: बनावट कागदपत्रांचा वापर करत एक २९ वर्षाचा तरुण हा लंडनला निघाला होता. मात्र ही बाब इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला अडवले आणि सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीचे नाव गौतमकुमार करशनभाई इटालिया असे आहे. तो ९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणाहून विमानाने लंडनला जाणार होता. दरम्यान इमिग्रेशन चाचणीसाठी तो काउंटर वर आला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासला ज्यात त्यांना पान क्रमांक २२ वर युके देशाचा शैक्षणिक व्हिसा आढळला. त्यामुळे त्यांनी गौतमकुमारला लंडनला जाण्यामागचा हेतू विचारला तसेच त्याला कोणत्या आधारावर हा व्हिसा मिळाला याबाबतही चौकशी केली गेली. मात्र यावर तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच त्याने सादर केलेले मध्यप्रदेश राज्य शिक्षण मंडळाचे बी ई पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र देखील बनावट निघाले. तो मुळात फक्त दहावीपर्यंत शिकला असून त्याने इलेक्ट्रिक डिप्लोमा हे शिक्षण पूर्ण केले. त्याला उज्वल भविष्यासाठी लंडनमध्ये स्थलांतरित व्हायचे होते. मात्र शिक्षणात सात ते आठ वर्षांचे अंतर पडल्याने त्याने गुजरातमधील सुरत या ठिकाणी फॅमिली नावाच्या एजंटला १ लाख ३० हजार रुपये देऊन बनावट मार्कशीट आणि युके देशाचा स्टुडन्ट व्हिसा मिळवला होता असे अधिक तपासात उघडकीस आले. त्यानुसार इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने मुंबई ते इस्तंबूल तसेच तिथून लंडनला निघालेल्या गौतमकुमारला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.