मुंबई: विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनिल शिंदे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाल्यानं चुरस निर्माण झाली होती. उत्तर भारतीय राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपचे मराठी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर बंगल्यावर कालच भाजपच्या नगरसेवकांची भेट घेतली.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सुरेश कोपरकरांनी अर्ज भरल्यानं भाजप अलर्टवर होता. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं कोपरकरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांची बरीचशी भिस्त नाराज नगरसेवकांवर होती. मात्र आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राजहंस सिंह यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेचे सुनील शिंदेदेखील आता आमदार म्हणून सहज निवडून येतील. सुनील शिंदे यांनी विधानसभेत वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडला. त्यामुळे आता त्यांचं विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येत आहे.