- नामदेव मोरे (नवी मुंबई)
मुंबईमध्ये डाळींसह कडधान्याची आवक घसरली असून, बाजारभाव वाढले आहेत. मसूर, तूरडाळ, उडीदडाळ, मूग व वाटाण्याची आवक निम्म्यापेक्षा कमी झाली असून, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत. जवळपास एक वर्षापासून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर असल्यामुळे मुंबईकर चांगल्या दिवसांचा अनुभव घेत होते.
बाजार समितीची मक्तेदारी संपल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी पर्याय उपलब्ध झाले होते. डाळींसह कडधान्याचे दर स्थिर होते, परंतु या आठवड्यात आवक प्रचंड घटली असून त्याचे परिणाम बाजारभावावर होऊ लागले आहेत. सप्टेंबरमध्ये सरासरी १०० ते १३० टन चणाडाळीची आवक होत होती. त्यामध्ये घसरण होऊन ७० ते ७७ टन आवक होत असून बाजारभाव ४६ ते ५३ वरून ५० ते ५५ रुपये किलो झाले आहेत. वाटाण्याची आवक १७ टनावरून ३ टनावर आली असून बाजारभाव चार रुपयांनी वाढले आहेत. मूगडाळीचे दरही ६२ ते ७० रुपयांवरून ६८ ते ७५ रुपये झाले.
मार्केटमधील आवक सातत्याने घसरू लागली असून, त्याविषयी अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली होती. आतापर्यंत घसरणाऱ्या आवकचा बाजारभावावर परिणाम होत नव्हता, परंतु या आठवड्यात दर वाढू लागल्यामुळे सण व उत्सवांच्या दिवसामध्ये महागाई वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये लातूर व इतर ठिकाणांवरून डाळींची आवक होत आहे, परंतु मागणी व पुरवठा यामध्ये मेळ बसेना झाला आहे. सद्यस्थितीमध्ये १ ते ४ रुपयांनी दर वाढले आहेत. दोन वर्षे बाजारभाव जवळपास स्थिरच होते. आवक कमी का झाली याविषयी ठोस कारण सांगितले जात नाही.
पूर्वी सर्व होलसेल मार्केटवर बाजार समितीचे नियंत्रण होते. यामुळे आवक का कमी झाली? हे सांगता येत होते, परंतु सद्यस्थितीमध्ये साठेबाजीमुळे आवक कमी झाली की परस्पर माल मुंबईत जात आहे याची माहिती प्रशासनाकडेही नाही. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी करून कृत्रिम भाववाढ केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बाजारभाव नियंत्रणात राहावे अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत. डाळी व कडधान्याची आवक घसरलेली असताना बाजरीची आवक १९ टनावरून ६३ टनावर गेली आहे. आवक वाढली असली तरी बाजारभाव मात्र स्थिर आहेत.
सप्टेंबरच्या तुलनेमध्ये गव्हाची आवकही कमी होऊ लागली आहे. आवक वाढली तरच भाव नियंत्रणामध्ये येतील, अशी माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली असून पुढील आठवड्यामध्ये वास्तव स्थिती स्पष्ट होईल, अशीही माहिती दिली आहे. दरम्यान, आवक वाढावी, यासाठी गृहिणी आशादायक आहेत. आधीच महागाईने महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. नवरात्र, दसरा झाला आता दिवाळी तोंडावर असताना आवक कमी झाल्याने गव्हाचे दर वाढण्याची शक्यतेने महिलांत चिंतेचे वातावरण ठरले आहे.