मुंबई : मुलुंड कॉलनी येथील राहुलनगरात शनिवारच्या पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला. सूरज गवई (वय 29 वर्ष) हा यात जखमी झाला असून, याच बिबट्याने रॉटविलर या प्रजातीच्या श्वानवरही हल्ला केला आहे. केईएम रुग्णालयात जखमी सूरजवर उपचार सुरू आहेत. तर पशुवैद्यकीय रुग्णालयात श्वानला दाखल करण्यात आले आहे. सूरजनं पाळलेल्या आपल्या श्वानाला बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गवई यांच्या घराबाहेर बांधलेल्या रॉटविलर प्रजातीच्या श्वानावर बिबट्याने प्रथम हल्ला चढवला, त्यामुळे श्वान मोठमोठ्याने ओरडू लागला. त्यामुळे सूरज आणि त्याचे आई-वडील घराबाहेर आले. त्याचक्षणी बिबट्याने सूरज गवईवर हल्ला चढवला आणि तो जंगलात पळून गेला. सूरजला त्वरित केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूरजच्या डोळ्याला व डोक्याला मोठी जखम झालीआहे.
‘रॉ’ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यासंदर्भात म्हणाले की, वनविभागाची टीम आणि रॉ संस्थेचे स्वयंसेवक परिसरात तपासणी करत आहेत. रॉ संस्था रविवारी रात्री हल्ल्याच्या परिसरात कॅमेरा ट्रपिंग करणार आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमार्फत हा बिबट्या पुन्हा श्वानाच्या शोधात आला तर त्याची माहिती मिळेल.
बिबट्याचा सायंकाळी हल्लाबिबट्याचे हल्ले सायंकाळच्या वेळेला होतात. हल्ल्यामध्ये एखादे लहान मूल सापडले असल्याचे वारंवार ऐकीवात येते.च्लहान मुलांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होणे, मुलांपासून दूर जाणे याचा फायदा घेत, बिबट्याने हल्ला केला आहे.
हे टाळा : बिबट्यांच्या क्षेत्रात काळजी घ्यायची असते. आवाज करत चालणे, सायंकाळच्या वेळी जाण्याचे टाळणे, लहान मुलांना घेऊन न जाणे, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
जागोजागी कॅमेरे : वनविभागाने जागोजागी कॅमेरे लावले आहेत. जर त्यात असा एखादा प्राणी आढळला तर त्याला वनविभागाची रेस्क्यू टीम पकडते. मात्र यासाठी लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. लोकांनीसुद्धा गैरप्रकार टाळले पाहिजे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
राहूल नगर परिसर हा नॅशनल पार्कच्या जंगलाला लागूनच आहे. हा बिबट्या श्वानच्या वासावर आला होता. रात्री दोनच्या सुमारास गवई यांच्या पाळीव श्वानवर बिबट्या हल्ला करत होता. गवई कुटुंब श्वानाच्या आवाजाने बाहेर आले असता बिबट्याने श्वानला सोडून सुरज गवई यांच्यावर हल्ला केला. - हसमुख वळंजू, प्राणीमित्र, रॉ संस्था