न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 5 च्या मागील संरक्षक भिंतीवरून ते इन्फिनिटी आयटी पार्कच्या पार्किंग लॉट मध्ये रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान एक बिबट्या नागरिकांना आणि इन्फिनिटी आयटी पार्कच्या कर्मचाऱ्यांना ये जा करतांना दिसला. या जून महिन्यांतील ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये घबराट पसरली असल्याची माहिती गिरीकुंज सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ.रामेश्वरी पाटील यांनी लोकमतला दिली.
या भागात असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वावराने येथे असल्याने त्यांची शिकार करण्यासाठी येथे बिबट्याचा वावर वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतने सातत्याने लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमधून बिबट्याच्या येथील वावराबद्धल वृत्त देऊन वाचा फोडली. आतापर्यंत दोनदा वनखात्याने तत्परता दाखवत येथील भागात येऊन त्यांचे पथक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील भागाची पाहाणी करून नागरिकांशी संवाद साधला.
दि,20 जून रोजी येथील इमारत क्रमांक 19 च्या मागील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सायंकाळी 6 ते 7.30 दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता. या सोसायटीच्या मागील बाजूस सुमारे 150 ते 200 फूट अंतरावर बिबटया चक्क कुत्र्याच्या शिकारीसाठी दीड तास इकडे होता. येथील इन्फिनिटी आयटी पार्कच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील गिरीकुंज सोसायटी इमारत क्रमांक 5 मध्ये दि,15 जून रोजी चक्क दुपारी दीडच्या सुमारास येथील सोसायटीच्या मागील बाजूस बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन संरक्षक भिंतीवरून चालत होता. तर त्याआधी तीन दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी मध्यरात्री बिबट्या येत होता.
या भागात पुन्हा बिबटयाचा असलेल्या वावराची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच वनसंरक्षक ठाणे विभाग रामराव यांच्याशी संपर्क साधला. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी त्यांनी केली.