Join us  

Mumbai: असामाजिक तत्त्वांपासून मालाड-मालवणीला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करुया! अस्लम शेख यांचे आवाहन

By मनोहर कुंभेजकर | Published: April 13, 2023 6:14 PM

Aslam Sheikh:

- मनोहर कुंभेजकरमुंबई : मालाड-मालवणी येथे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मोठी मिरवणूक निघते. मात्र उद्या ही मिरवणूक काढत असताना मालाड-मालवणीत धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने बाहेरुन येणाऱ्या असामाजिक तत्त्वांपासून सावध राहण्याचे व मालाड-मालवणीला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन फेसबूक पोस्ट शेअर करत आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालाड-मालवणीतील जनतेला केले आहे.

अस्लम शेख यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उद्या मालाड-मालवणीत मोठी मिरवणूक निघेल. फक्त बौद्ध बांधवच नव्हे तर हिंदू,मुस्लिम,शिख, ख्रिस्ती सर्व जाती- धर्मांचे बांधव या मिरवणूकीत उत्साहाने, आनंदाने सहभागी होतील. परस्परांच्या धार्मिक-सामाजिक आनंदोत्सवांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणं हा आम्हा मालाड-मालवणीकरांच्या स्वभावातला स्थायीभावच आहे. मात्र यावर्षी या महामानवाची जयंती साजरी करत असताना मनामध्ये थोडी धाकधुक आहे. थोडी अस्वस्थता आहे. या वर्षीच्या डॉ. आंबेडकर जयंतीला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी मालाड-मालवणीत निर्माण झालेल्या तणावाची.

सर्व जाती-धर्मांच्या लोकांना आपल्या हृदयाशी कवटाळणारी ही मालवणी आहे. एका आई आणि मुलामध्ये जे नातं असतं तेच नातं येथे राहणारे विविध धर्मिय बांधव व मालाड-मालवणीमध्ये आहे.मात्र ह्याच प्रेमाच्या नात्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला. मालाड-मालवणीत जनतेला शांतता आणि सलोखा हवा आहे. मात्र हेच शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण काहींच्या डोळ्यांत खुपत होतं. मालवणीतील सामाजिक, धार्मिक ऐक्याला कसा तडा जाईल, याबाबत कपटकारस्थानं रचली जात होती. अखेर राम नवमीच्या दिवशी या असामाजिक तत्त्वांनी डाव साधला आणि सामाजिक व धार्मिक ऐकोप्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मालवणीवर पहिला ओरखडा उठला. मात्र बाहेरुन येऊन मालाड-मालवणी अशांत करु पाहणाऱ्यांचा डाव मालवणीतील जनतेने घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे सपशेल फसला असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करताना  बाहेरुन येऊन मालाड-मालवणी अशांत करु पाहणाऱ्या समाजकंटकांपासून मालाड- मालवणीला  सुरक्षित ठेवायचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या शेवटी केले आहे.

टॅग्स :मुंबई