Join us

पहिल्याच पावसात वाहून गेला मध्य रेल्वेचा दावा; मुंबईची जीवनवाहिनी दिवसभर रडतखडत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 6:28 AM

मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याने लोकल पावसातही सुरळीतपणे धावेल, हा मध्य रेल्वेचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा पहाटेपासून दिवसभर पांगळी झाली होती. परिणामी, प्रवाशांना दिवसभर रखडत प्रवास करावा लागला. मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याने लोकल पावसातही सुरळीतपणे धावेल, हा मध्य रेल्वेचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला.

सोमवारी सकाळी पावणेसातला भांडूप, नाहूरसह कुर्ला, सायन, विद्याविहार येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. ठाण्यापासून सीएसएमटीपर्यंतची लोकल सेवा बंद झाल्याने ठाण्यापलीकडील चाकरमानी प्रामुख्याने ठाणे आणि त्यापुढील रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. बहुतेक लोकल एक ते दीड तासाने धावत होत्या. सकाळी कामधंद्यासाठी बाहेर पडलेल्यांची सकाळ पाण्यात गेली. रेल्वे प्रशासन नोकल प्रवास टाळण्याचे आवाहन करीत रेल्वेची मंदगती, होते. मात्र रस्त्यांवरही पाणी साचल्याने प्रवाशांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली होती.

प्रवाशांची रखडपट्टी

कर्जत आणि कसारा येथून सीएसएमटीकडे येण्यासाठी तास ते दीड तास विलंब, ताण्यापासून पुढे लोकलचा वेग कासवापेक्षाही कमी होता.

हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. कालांतराने ही वाहतूक सुरू झाली पण लोकलच्या मंदगतीमुळे प्रवाशांचा बराचवेळ वेळ प्रवासात गेला.

पनवेल-मानखुर्द-पनवेल, गोरेगाव-सीएसएमटी-गोरेगाव मागांवर लोकल चालविण्यात आल्या. मात्र त्यांचा वेग कमी असल्याने प्रवाशांचा लेटमार्क लागला.

रविवारी रात्री सहा तासांत ३०० मिमी पाऊस पडला. त्यामुळे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची मेन लाइन बंद पडली. आम्ही काही लोकल रद्द केल्या, तर काहींचे मार्ग वळविले, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रवाशांना केले, लोकलसेवा वेळेत पूर्वपदावर आणण्यासाठी काम केले - राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे 

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलपाऊसमध्य रेल्वे