मुंबई: एकीकडे सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे मुंबई,ठाणे आणि अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही मुंबई लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने अजून हिरवा कंदील दाखवला नाही. महाराष्ट्र सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरीकांना लोकल ट्रेन मध्ये लवकर प्रवासाची परवानगी द्यावी अशी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत असली तरी राज्य सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याचदरम्यान मुंबई लोकलसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधकांकडून देखील लोकल सुरु करण्याबाबत वारंवार मागणी केली जात असताना हे प्रकरण सध्या हायकोर्टात देखील सुनावणीखाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार, यावर उद्धव आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यासंदर्भात लवकरच मुंबईकरांशी संवाद साधणार, असेही ते म्हणाले. मुंबईतील एच-पश्चिम वॉर्डमधील वॉर्ड ऑफिसच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, मनसेने लोकल प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.