मुंबई लोकल लाईफलाईन नव्हे डेडलाईन, माहिती अधिकारातून रेल्वे पोलिसांच्या माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:13 PM2018-01-25T22:13:38+5:302018-01-25T22:13:50+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे अर्थात मुंबई लोकल. लोकलमधून रोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यामुळे लोकलची ओळख ही मुंबईची लाईफलाईन अशी केली जाते.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे अर्थात मुंबई लोकल. लोकलमधून रोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यामुळे लोकलची ओळख ही मुंबईची लाईफलाईन अशी केली जाते. मात्र गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवर १ हजार ९२८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पश्चिम रेल्वेवरील १ हजार ०८६ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी गेल्या वर्षी तब्बल ३ हजार १४ प्रवाशांचा मृत्यू आणि ३ हजार ३४५ प्रवासी अपघातात जखमी झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्येकर्ते समीर झवेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी जास्तीतजास्त फे-या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. प्रवाशांच्या मागण्या व अडचणी मांडण्यासाठी वारंवार प्रवासी संघटना विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांच्या कार्यालयाच्या पाय-या झिजवतात. मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात येते. रेल्वे माहिती अधिकार कार्येकर्ते समीर झवेरी यांनी लोहमार्ग पोलिसांकडे जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीतील रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू आणि अपघातांची आकडेवारी सादर करण्याची विनंती केली होती.
वडाळा रोड, ठाणे आणि अंधेरी...
हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकात गेल्या वर्षी सर्वाधिक अपघात झाले आहेत. यात २२ प्रवाशांचा मृत्यू तर ४७ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात २९२ प्रवाशांचा अपघात झाला असून यात १३७ प्रवाशांचा मृत्यू तर १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात एकूण २२० अपघात झाले असून यात ७० प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५० प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत.
...............................................
(जानेवारी ते डिसेंबर २०१७ रेल्वे अपघात)
मार्ग अपघाती मृत्यू अपघातात जखमी
मध्य रेल्वे
सीएसएमटी ते पनवेल १९२८ १८०५
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते पालघर १०८६ १५४०
एकूण ३०१४ ३३४५