मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 09:30 AM2018-12-16T09:30:48+5:302018-12-16T09:32:54+5:30
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाटी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाटी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे.
सीएसएमटी ते भायखळादरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते भायखळादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. सीएमएमटीहून कल्याणसाठी धीम्या मार्गावरील शेवटची लोकल सकाळी 10.40 वाजता सुटेल, तर सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल भायखळा स्थानकात सकाळी 9.50 वाजता पोहोचेल.
ठाण्याहून सीएसएमटी, दादरसाठी जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस सकाळी 10.16 नंतर मुलुंड आणि माटुंगामध्ये अप धीम्या मार्गावर चालतील. त्यामुळे गाड्या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा येथेच थांबवण्यात येणार आहे. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर रविवारी दिव्याहूनच सुटेल. दादर ते दिव्यापर्यंत मध्य रेल्वेने दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल सोडली आहे. ही लोकल ठाणे आणि दिवा स्थानकांत थांबेल.
तर दुसरीकडे, हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी आणि वडाळा मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान सीएमएमटी ते वडाळादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि वांद्रे, गोरेगावसाठी दर 10 ते 15 मिनिटांसाठी लोकल धावणार आहेत. सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल सकाळी 10.10 वाजता सुटेल. तर पनवेलहून सुटलेली शेवटची लोकल वडाळा स्थानकात सकाळी 9.52 वाजता येईल. ठाण्याहून वाशीपर्यंत सकाळी 10.45 ते दुपारी 04.09 पर्यंत लोकल सेवा खंडित राहतील. या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेलपर्यंतही सेवा खंडित राहतील.