उद्याचा लोकल प्रवास गोंधळाचा; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:08 AM2024-05-11T09:08:21+5:302024-05-11T09:09:23+5:30
Mumbai Local Megablock on Sunday 11 May: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ३:१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत, तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगावदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल सांताक्रूज ते गोरेगावपर्यंत जलद मार्गावर चालविल्या जातील.
सीएसएमटी येथून सकाळी १०:२५ ते दुपारी २:४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे त्या १५ मिनिटे उशिराने धावतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:०८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या लाइनवर वळविण्यात येतील. पुन्हा माटुंगा येथील अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
असे असेल गाड्यांचे वेळापत्रक
सीएसएमटी येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष गाड्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ठाणे - वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वे
डाउन जलद मार्गावर ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून सकाळी १०:२० वाजता बदलापूरकरिता शेवटची लोकल धावेल. तर, ब्लॉकनंतर सीएसएमटी येथून दुपारी ३:०३ वाजता बदलापूरकरिता पहिली लोकल सुटेल.
अप जलद मार्गावर ब्लॉकपूर्वी अंबरनाथ-सीएसएमटी शेवटची लोकल आहे. ती सीएसएमटी येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर कर्जत-सीएमसएमटी पहिली लोकल सुटेल. ती दुपारी ३:५५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
हार्बर रेल्वे
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी-पनवेल असून, ती सकाळी १०:१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल असून, ती दुपारी ३:४४ वाजता सुटेल.
सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०:०५ वाजता सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटेल.
पश्चिम रेल्वे
विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकात लोकलला थांबा नसेल. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द असतील.