Mumbai Local : 'त्या' व्हायरल व्हिडिओची 'मनसे' दखल, अमीनच्या पाठिशी 'हा' गजानन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 09:45 PM2021-10-30T21:45:11+5:302021-10-30T21:46:34+5:30
वाशी ते पनवेल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका 9 वर्षीय मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमीन असं या मुलाचं नाव असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी अमीनचं कौतुक केलंय
मुंबई - राजधानी मुंबईच्या लोकलमध्ये दररोज जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची भेट होते. कुणी डोक्यावर स्वत:च्या वजनाएवढं ओझं घेऊन धावत असतो, तर कुणी वेळेत पोहोचायचं म्हणून पळत असतो. तर, त्याच ट्रेनमध्ये गाणी गावून, काही दैनंदिन किरकोळ वस्तू विकून आपला चरितार्थ चालवत असतात. दोन दिवसांपूर्वी पनवेलला धावणाऱ्या ट्रेनमध्ये अशाच एका वह्या विकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, नवी मुंबईतील मनसैनिकांनी या चिमुकल्यासाठी मदतीचा हात पुढे केला. तसेच, त्याच्या शिक्षणाचा खर्चही उचलला.
वाशी ते पनवेल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका 9 वर्षीय मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमीन असं या मुलाचं नाव असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी अमीनचं कौतुक केलंय. तसेच, आमचा सहकारी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी प्रदीप यास लोकलमध्ये अमीन भेटला, त्यावेळी वाशी ते पनवेल या प्रवासात तो वह्या विकण्याचं काम करतो. घरातील आर्थिक परिस्थिती नसल्याने, शिक्षणासाठी पैसे नसल्याने तो वयाच्या 9 व्या वर्षापासूनच हे काम करत असल्याचे समजले.
प्रदीपने अमीनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मदतीचा ओघही सुरू झाला. अमीनने यापुढे वह्या विकण्याचं काम करो न करो, पण त्याने शाळेत जायला हवं. शाळा शिकून उच्च शिक्षण घ्यावं, असे गजानन काळे यांनी म्हटलं. तसेच, अमीनच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थी सेनेच्यावतीने आम्ही घेत आहोत, असेही काळे यांनी सांगितलं. आमीनला पोलीस व्हायचं आहे, आज वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही तो आईला वह्या विकून आधार देतोय, म्हणून आमीनचं कौतुक वाटते, असेही काळे यांनी म्हटले.