मुंबईच्या पश्चिम रेल्वे लाइनवरील सहाव्या मार्गिकचं काम आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. या टप्प्यात गोरेगाव ते बोरीवलीपर्यंतचं रेल्वे ट्रॅक टाकण्याचं काम केलं जाणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील काही महिन्यांत पुन्हा मेगाब्लॉकच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेनं ६ नोव्हेंबर रोजी सहाव्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. आता दुसऱ्या टप्प्यात ही मार्गिका थेट बोरीवलीपर्यंत नेली जाणार आहे. २०२४ च्या मध्यापर्यंत गोरेगाव ते बोरीवली टप्पा पूर्ण करण्याचं पश्चिम रेल्वेचं लक्ष्य आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेकडून हे काम मार्च २०२४ किंवा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. सहाव्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात काही आव्हानं रेल्वे प्रशासनासमोर आहेत. यात मालाड, कांदिवली, बोरीवली येथे रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या रेल्वे वसाहती, झोपडपट्ट्या आणि इमारतींचा प्रश्न आहे. हे बांधकाम हटवणं आणि पुनर्वसन करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.