Join us

Mumbai Local, Bandra Lift Incidence | वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकले २० जण, अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:26 IST

नक्की कोणत्या लिफ्टजवळ घडला हा धक्कादायक प्रकार, कशी झाली सुटका... वाचा सविस्तर

Mumbai Local, Bandra Lift Incidence: मुंबई लोकलच्या अनेक रेल्वे स्टेशनवर हल्ली लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण बुधवारी सकाळी या लिफ्टने २० जणांना काही काळासाठी घाम फोडला. बुधवारी सकाळी सुमारे २० प्रवासी वांद्रे रेल्वे स्टेशनवरील एका लिफ्टमध्ये अंदाजे अर्धा तास अडकून पडले होते. पोलिस कॉन्स्टेबल शाहीन पठाण या वांद्रे रेल्वे पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने योग्य वेळी कर्तव्यतत्परता दाखवून या साऱ्यांनी मदत मिळवून दिली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले.

नक्की कुठे घडला प्रकार?

पश्चिम रेल्वेने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकातील विविध फलाटावर जाण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची सोय केली आहे. मात्र हीच लिफ्ट प्रवाशासाठी धोकादायक देखील ठरू शकते याची प्रचिती आज वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांना आली. मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि पादचारी फुल यांना जोडणाऱ्या लिफ्ट मध्ये २० प्रवासी अडकले. मात्र पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी या सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर आणले.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे स्थानकातील (Railway Station) फलाट क्रमांक 1 वरील लिफ्टने काही दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक प्रवासी दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी निघाले. मात्र लिफ्टचे (Lift) दरवाजे बंद झाल्यानंतर लिफ्ट अर्ध्यावर जाऊन अडकली. लिफ्ट मधील पंखा देखील बंद झाला. यामुळे आत मध्ये असलेले सर्व प्रवासी प्रचंड घाबरून गेले. या ठिकाणी गस्तीवर असलेले पो.शि. शाहीन अल्ताफ पठाण यांना या लिफ्टच्या गेट जवळ बीप- बीप असा आवाज ऐकून प्रसंगावधान दाखवले. प्रवाशी अडकले असावेत अशी शक्यता त्यांना वाटल्याने, त्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांचे कार्यलयात जाऊन स्टेशन मास्तर यांना सांगितले. पठाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इलेक्ट्रिशियनला संपर्क करून तात्काळ बोलावून घेतले. पुढील १५ ते २० मिनिटे प्रयत्न करूनही लिफ्ट चालू होत नव्हती व आतील प्रवाशी मदतीसाठी आवाज देत होते. अशा वेळी इलेक्ट्रिशियन व पो.शि यांनी स्टेशनच्या ब्रिजवर जाऊन चावीने लिफ्टचा अर्धा दरवाजा उघडला व लिफ्ट मध्ये अडकलेल्या २० ते २२ प्रवाशांना खेचून सुखरूप बाहेर काढले आहे. लिफ्टमध्ये २० ते २२ प्रवाशी सुमारे अर्धा तास अडकून राहिले होते असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईलोकलरेल्वेपोलिस