Mumbai Local: मुंबई लोकलनं रात्रीचा प्रवास नको गं बाई! GRP च्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:20 PM2024-04-08T12:20:31+5:302024-04-08T12:22:13+5:30
Mumbai Local: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या लोकल सेवेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Mumbai Local: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या लोकल सेवेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण महिला सुरक्षेच्याबाबतीत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक सर्वेक्षण केले. यात महिला प्रवाशांचे अनुभव, समस्या, शिफारशी याबाबत आढावा घेतला गेला. १ ते ३१ मार्च कालावधीत महिला प्रवाशांची मतं जाणून घेण्यात आली. यात समोर आलेल्या माहितीनुसार ४० टक्के महिलांनी लोकलमध्ये रात्री ११ नंतर प्रवास करणं असुरक्षित वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर २८ टक्के महिलांनी रात्री १० नंतरच्या प्रवासासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण ३ हजार महिलांनी सहभाग घेतला होता.
प्रवासासाठी लोकलचा किती वेळा वापर, प्रवासमार्ग, पासधारक-तिकीटधारक, वय, प्रवासाचे कारण, प्रवासाची वेळ, कोणत्या वेळेत असुरक्षितता वाटते, लोकल डब्यासह फलाटांवरील सुरक्षितता, गणवेशधारी पोलिस असावेत का? असे प्रश्न महिला प्रवाशांना विचारण्यात आले होते.
सर्वेक्षणातून समोर आलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे...
- रेल्वे प्रवासात एखादा गुन्हा घडल्यास केवळ २९ टक्के महिलाच तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलीस ठाणे गाठतात.
- उर्वरित ७१ पैकी ६४ टक्के महिला केवळ भीतीपोटी तक्रार करत नाहीत. तर १२ टक्के महिला लैंगिक गुन्ह्यात लाजेखातर तक्रार करत नाहीत.
- चोरीच्या बाबतीत मालमत्ता किंवा वस्तूची किंमत तक्रार करण्यासारखी नसल्याचे सांगत १२ टक्के महिला प्रवासी ठाणे गाठत नाहीत.
महिला प्रवाशांनी केलेल्या मागण्या
- रात्रीच्या प्रवासात महिला डब्यात वर्दीतील सुरक्षा वाढवणे
- तिकीट तपासणी वाढवणे
- लोकल फेऱ्या वाढवणे
- महिला डबे वाढवणे
- महिलांच्या डब्यातील भिकारी/दारूड्यांवर कारवाई
- पुरुष फेरीवाल्यांवर कारवाई