लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:31 IST2025-04-12T10:29:14+5:302025-04-12T10:31:23+5:30
Mumbai Local Railway: मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान
मुंबई - मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच येत्या काळात मुंबई लोकलच्या अधिक फेऱ्या चालवण्याच्या दृष्टीने कामे सुरू असल्याचे ते म्हणाले.
मुंबई उपनगरीय सेवांच्या वाढीसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रेल्वेचे सुमारे १७ हजार कोटींचे प्रकल्प सुरू असून, त्यामध्ये ३०० किलोमीटरहून अधिक नवीन मार्गांचा समावेश आहे. त्यामध्ये कुर्ला- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाचवी, सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी, सहावी मार्गिका, हार्बर मार्गाचे गोरेगाव ते बोरिवली एक्सटेन्शन, बोरिवली-विरार पाचवी, सहावी मार्गिका, पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर अशा विविध नवीन मार्गिका उभारण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
उपनगरी रेल्वे सेवांच्या ३० टक्के अधिक फेऱ्या चालवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. कम्युनिकेशन ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टीम (सीबीटीसी) समावेश असलेली कवच ५.० ही मुंबई केंद्रित सिग्नल प्रणाली डिसेंबरपर्यंत विकसित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सेवांमध्ये वाढ करण्यास मदत होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. त्यासोबतच येत्या काळात मुंबई लोकलच्या ताफ्यात २३८ नवीन एसी लोकल दाखल करण्यात येणार असून, त्यांच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या खास डिझाइन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्याची विनंती केंद्र शासनाला केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दीड फूट पाण्यातही चालणार लोकल
पावसाळ्याच्या काळात रेल्वे सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी नवीन पॉईंट मशीन विकसित केले आहे. या अद्ययावत पॉईंट मशीन दीड फूट पाण्यातदेखील काम करू शकतील अशा पद्धतीच्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे रुळांलगत पाणी साचू नये, यासाठी मुंबईत ३६ ठिकाणी मायक्रो टनेलिंग सुरू करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.