Join us

मुंबई...जिथं प्रत्येक सेकंद मौल्यवान! हार्बर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार, कसा? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:50 PM

मध्य रेल्वेने हार्बर लोकलच्या मार्गाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local : मध्य रेल्वेने हार्बर लोकलच्या मार्गावरील प्रवाशांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर टिळक नगर ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे. ३ जून रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मंगळवारपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. वेळेची बचत करणे आणि वक्तशीरपणा सुधारणे हा यामागचा उद्देश असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणं आहे.

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेलदरम्यानलोकलचा वेग ८० किमीवरुन ९५ किमी पर्यंत वाढवला आहे. यामुळे सीएसएमटी ते पनवेलदरम्यान प्रवासाचा वेळ पाच मिनिटांनी कमी झाला आहे. तसेच सीएसएमटी ते पनवेलदरम्यानचा प्रवास काहीसा वेगवान झाला आहे. सोमवारपर्यंत टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल ताशी ८० किमी वेगाने धावत होत्या. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल अंतर पार करण्यासाठी ८० मिनिटे म्हणजेच एक तास २० मिनिटे लाग होती. मात्र आता वेग वाढल्याने काही प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.

मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते पनवेलदरम्यान १८८ आणि सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान ७९ सेवा चालवण्यात येतात. सीएसएमटी ते पनवेल हे अंतर कापण्यासाठी लोकलला ८० मिनिटांचा आणि सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान ६५ मिनिटांचा वेळ लागतो. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन स्लो अशा दोन रेल्वेरुळ असल्याने या मार्गावर धीम्या लोकल धावतात. त्यामुळे या मार्गावरील प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी लोकलचा वेग  १०५ पर्यंत वाढवावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा वेग ९५ किमी पर्यंतच वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यातही हा बदल केवळ टिळक नगर ते पनवेल स्थानकांदरम्यानच लागू असणार आहे. त्यामुळे टिळकनगर ते पनवेल या ३२.५३ किमी मार्गात लोकलचा वेग वाढवला आहे.

दुसरीकडे सीएसएमटी-टिळकनगर दरम्यानच्या दर दोन स्थानकांमधील अंतर १ ते २ किमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकात लोकल थांबवून पुन्हा वेग कमी-जास्त करावा लागणार आहे. मात्र टिळकनगर स्थानकानंतर दोन स्थानकांतील अंतर वाढते. याच कारणामुळे सीएसएमटी-टिळकनगर दरम्यान लोकलचा वेग वाढवण्यात आलेला नाही.

दरम्यान, कुर्ला ते मानखुर्द दरम्यानच्या रेल्वे रुळ असलेल्या भागाला कुंपण लावल्यास तेथील लोकलचा वेग वाढू शकेल, असे अनेक प्रवाशांनी सुचवले आहे. सध्या, हार्बर मार्गावरील गाड्यांना कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यान प्रवास करण्यासाठी ३३ मिनिटे लागतात. त्या तुलनेत मध्य रेल्वेवरुन दोन्ही मार्ग समान अंतर असतानाही ३० मिनिटे लागतात. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेलला जाण्यासाठी अधिक गाड्या चालवण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेलोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपनवेल