मुंबई : वडाळ्याजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. सकाळच्या वेळेसच रेल्वेसेवा ठप्प झाल्यानं लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा असलेल्या आणि अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील वडाळ्याजवळ असलेल्या रेल्वे प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वडाळा ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसटी या सर्व लोकल गाड्या बंद होत्या. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत झाली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. मात्र, राज्य सरकारने अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
याचबरोबर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहता यावे यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसाय हाेऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे.
याशिवाय, दिवाळीनंतर सर्वसामान्यांसाठी सुद्धा लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरु असून लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात येऊ शकते.