मुंबई : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने कोरोनापूर्व काळाइतक्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ ऑक्टोबर २०२१ पासून १०० टक्के उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर १,७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १,३६७ सेवा चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारने परवानगी दिलेल्या म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि लसीचे दोन घेतलेल्यांना, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ जून २०२० पासून रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या.
गर्दीमुळे वाढवली संख्या १५ ऑगस्ट २०२१ पासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांत वाढ केली होती. सध्या ९५ टक्के फेऱ्या चालविण्यात येत होत्या. सध्या मध्य रेल्वेच्या १,७०२ तर पश्चिम रेल्वेच्या १,३०४ फेऱ्या सुरू होत्या.