Mumbai Local Train: मुंबईची लाफइलाइन असलेली लोकल सेवा १५ ऑगस्टपासून कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टच्या दुपारी ४ वाजेपर्यंत जवळपास १ लाख २६ हजार ८८३ नागरिकांनी लोकलचे पास काढले आहेत. आतापर्यंत ही संख्या दिड लाखाच्या वर पोहोचली असेल. काल सुटीचा दिवस असल्यानं गर्दी कमी होती. तर आज पारसी नववर्ष असल्यानं सुटी आहे. त्यामुळे आजही त्यामानानं गर्दी कमी आहे. पण मासिक पासची संख्या पाहता आता उद्यापासून लोकलची गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल सेवा आता पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local Train that is Mumbai Suburban Railways is operational with full of capacity for common passengers who have fully vaccinated)
मुंबईतील लसीकरण मोहिमेच्या वेगावरच लोकल मधील गर्दी अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात लोकलची गर्दी वाढतच जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या एका दिवसात सरासरी दीड लाख लोकांचं लसीकरण होत आहे. त्यात लोकलचा मासिक पास काढण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमक्या किती फेऱ्या वाढल्या?कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे मुंबईच्या लोकल फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. पण आजपासून मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनानं लोकलच्या २९८६ फेऱ्या सुरू केल्या आहेत. यात मध्य रेल्वेवर १६८६, तर पश्चिम रेल्वेवर १३०० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर मध्य रेल्वेवर १६१२ फेऱ्या सुरू होत्या. यात ७४ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार कोरोना आधीच्या काळात मध्य रेल्वेवर एकूण १७७४ फेऱ्या होत होत्या. पश्चिम रेल्वेबाबत सांगायचं झालं तर यात आता ९९ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील १२०१ फेऱ्यांमध्ये वाढ होऊन आता १३०० फेऱ्यांपर्यंत संख्या पोहोचली आहे. कोरोना पूर्वीच्या काळात पश्चिम रेल्वेवर १३६७ फेऱ्या होत होत्या. म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या सध्या ९५ टक्के क्षमतेनं सुरू आहेत.
डोंबिवली स्थानकात सर्वाधिक पासमासिक पास बनवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. यात मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात सर्वाधिक पास तयार करण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात सर्वाधिक पास तयार करण्यात आले आहेत. डोंबिवली स्थानकात १५ ऑगस्टच्या दुपारपर्यंत ७ हजार ९१५ पासेसची विक्री करण्यात आली. तर बोरीवली स्थानकात एकूण ४ हाजर ७२ पासेसची विक्री झाली आहे. यापाठोपाठ कल्याण, बदलापूर, मुलुंड, ठाणे, मानखुर्द, सीएसएमटी स्थानकांवर सर्वाधिक पास तयार करण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवलीसोबतच भाईंदर, कांदिवली, अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि चर्चगेट स्थानकांचा समावेश आहे.