मेगाब्लॉक नसतानाही मेगाहाल! दुपारच्या सत्रातील जलद लोकल फेऱ्या धिम्या मार्गावरून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:22 AM2018-11-05T06:22:31+5:302018-11-05T06:22:47+5:30
दिवाळी आणि रविवारची सुट्टी यानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या आनंदावर रेल्वे प्रशासनाने विरजण घातले.
मुंबई - दिवाळी आणि रविवारची सुट्टी यानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या आनंदावर रेल्वे प्रशासनाने विरजण घातले. मेगाब्लॉक नसतानाही रविवारी दुपारच्या सत्रातील जलद मार्गावरील लोकल फेºया धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल फे-या विलंबाने धावत होत्या. परिणामी, खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकात गर्दी आणि मनस्ताप यांचा सामना करावा लागला.
दिवाळी खरेदीतील शेवटच्या टप्प्यातील खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले. यामुळे दुपारच्या सत्रातील दादरसह कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली अशा स्थानकांत लोकलला मोठी गर्दी होती, शिवाय स्थानकात लोकल विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे प्रशासनाकडे मध्य मार्गावर रविवारी कोणत्याही बिघाड अथवा विलंबाची नोंद झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली, पण दादर रेल्वे स्थानकात रविवारी दुपारच्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. इंडिकेटरनुसार प्रवाशांनी संबंधित फलाटावरून लोकल पकडली. तत्पूर्वी बहुतांशी नागरिकांनी लोकलची वाट पाहण्यासाठी पुलावर थांबल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मध्य मार्गावर मेगाब्लॉक नसल्याची घोषणा करून रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला. मात्र, रविवारी दुपारच्या सत्रातील लोकलकल्लोळामुळे प्रवासी हवालदिल झाले होते.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याची पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने दिल्याने प्रवाशांनी रेल्वे स्थानकांपेक्षा पर्यायी वाहतूक व्यवस्थेने प्रवास पूर्ण करत दिवाळी खरेदीचा आनंद घेतला.
मात्र, रेल्वे प्रवास अनिवार्य असलेल्या हार्बर प्रवाशांना मात्र रेल्वे स्थानकात गर्दी आणि लोकल विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा
दवाळीचा उत्साहात रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रस्ते मार्गांनी प्रवास करणाºयांना रविवारीदेखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दादर टिळक पुलासह प्लाझा येथून सेनाभवनकडे जाणारा मार्गावर वाहने अत्यंत धिम्या गतीने सरकत होती. रस्त्यांवरील बहुतांशी पदपथावर दिवाळीनिमित्त सामानांची दुकाने थाटल्याने नागरिकांना प्रवाशांना रस्त्यांवरील वाहतूककोंडीतून वाट काढत चालावे लागत होते. मेट्रो कामांमुळे अरुं द झालेले रस्ते आणि दिवाळीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची वाहने, यामुळे वाहतूककोंडी झाली होती. एकंदरीत शहरातील वाहतूककोंडी पाहता, वाहतूक पोलिसांच्या उपाययोजना केवळ कागदांवरच असल्याचे चित्र होते.