मुंबई - कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली मुंबईतील लोकलसेवा आता बऱ्यापैकी रुळावर आली आहे. आता मुंबईतील लोकल सेवेमधील एसी लोकलकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या निर्णयानुसार आता एसी लोकलमधून नॉन एसी किंवा सेकंड क्लासमधील प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे. असे केल्यास त्यांना कुठलाही दंड भरावा लागणार नाही. तसेच मासिक पासधारकांनाही या एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मात्र या प्रवासाच्या तिकिटाचा आणि सेकंड क्लासमधील तिकिटादरम्यानचा फरक प्रवासांना जमा करावा लागेल.
एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय ङेतला आहे. एसी ट्रेनची सुरुवात ही २०१७ मध्ये झाली होती. मात्र अद्यापही या ट्रेनला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल यांनी याबाबत सांगितले की, हा निर्णय अधिकाधिक प्रवासी पश्चिम रेल्वेकडे वळावेत, यासाठी घेण्यात आला आहे.त्यांनी सांगितले की, या प्रयोगाची चाचणी एका महिन्याच्या आत सुरू केली जाणार आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती प्रवाशांना देण्यात येईल.
सद्यस्थितीत चर्चगेट ते विरारदरम्यान जाणाऱ्या एसी लोकलचे तिकीट हे किमान ६५ ते कमाल २२० रुपये एवढे आहे. कंसल यांनी पुढे सांगितले की, येत्या दिवसांमध्ये एसी लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येईल. सध्या पश्चिम रेल्वेजवळ चारा एसी रेल्वे गाड्या आहेत. यामध्ये केवळ दोन लोकल ह्या ऑपरेशनल आहेत, त्या दिवसातून १२ फेऱ्या चालवतात.