लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आज पुरुषांच्या बरोबरीने महिलाही नोकऱ्या करत आहेत. कामाच्या स्वरूपानुसार त्याही रात्री उशिरा लोकलमधून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलिस कर्मचारी तैनात असतो. स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासन महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करत असूनही प्रवासादरम्यान विनयभंग, बलात्कार, छेडछाड असे प्रकार होत असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलिसांनी साडेपाच महिन्यांत ४६ पैकी ४४ गुन्ह्यांचा तपास केला. परंतु आमचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार, असा सवाल महिला प्रवासी विचारत आहेत.
मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे या तीनही मार्गांवरून दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. यात महिलांची संख्या २० टक्के आहे. महिलांच्या डब्यांत रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पोलिस असतात. ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याने मध्य, पश्चिम रेल्वेकडून महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला.
- दीड वर्षात पश्चिम रेल्वेवरील काही लोकलच्या महिला डब्यात तर मध्य रेल्वेवरील काही लोकल डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात आले.
- मात्र एकंदरीतच प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्याने रेल्वेने लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
- याची अंमलबजावणी होण्यापूर्वी काही तांत्रिक मुद्देही उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच याची अंमलबजावणी होण्यास बराच कालावधी जाऊ शकतो.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही रेल्वे प्रशासन किंवा लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून महिलांबाबतीतील गुन्हे रोखण्यास अपयशच येत आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनांना तोंड द्यावे लागत आहे.
‘महिला डब्यात सकाळी ९ पर्यंत पोलिस ठेवा’
लोकलमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर अतिप्रसंगाच्या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल आणि रेल्वे सुरक्षा आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांची भेट घेतली. महिला लोकल डब्यात सकाळी ९ पर्यत पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी समोर आली. पोलिसांनी आरोपीला चार तासांत अटक केली. मात्र या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून महिला लोकल डब्यात पोलिस आणि आरपीएफच्या जवानांची वेळ वाढविण्याची मागणी केली आहे. सध्या महिला डब्यात रात्री ८.३० पासून ते सकाळी ६ पर्यत जवान तैनात असतात. मात्र सकाळी सीएसएमटी आणि चर्चगेटवरून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात पोलिस तैनात नसल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महिला लोकल डब्यात सकाळी ९ पर्यंत पोलिस तैनात करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.
गेल्या पाच महिन्यांत बलात्कार, छेडछाडीचे ४६ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी ४४ गुन्हे उघड झाले आहेत. महिलांनी रेल्वे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांना तत्काळ मदत केली जाते. - रवींद्र शिसवे, आयुक्त, लोहमार्ग पोलिस
रेल्वे पोलिसांकडून गुन्ह्यांचा तपास केल्याची आकडेवारी दाखवण्यात येते. मात्र कित्येक गुन्ह्यात समान आरोपी असतात. हा योगायोग नसून केवळ दिखावा केला जात आहे. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ