Mumbai Local Train Status Latest Update: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा फटका मुंबईची 'लाइफ लाइन' असलेल्या लोकल सेवेला देखील बसला आहे. मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचताना वाहतूकच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे जी रेल्वे स्थानकं सखल भागात आहेत अशा स्थानकांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली तर सध्या धीम्या गतीनं सुरू असलेली लोकल वाहतूक आणखी प्रभावित होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई शहराच्या दिशेनं चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामासाठी येत असतात. यासाठी मुंबईची लोकल सेवा चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी ठरते. पण पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या २० ते २५ मिनिटं उशीरानं सुरू आहे. त्यामुळे लोकल सेवेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. हार्बर लाइनवरील सेवा देखील २० मिनिटं उशिरानं सुरू आहे. तसंच पश्चिम रेल्वे मार्गावरही पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.
तिन्ही रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सध्या सुरू असली तरी ती अत्यंत धीम्या गतीनं होत आहे. त्यातच पावसाचा जोर आणखी वाढणार असून मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशात पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे असणार आहे. त्यामुळे कामावर निघण्याआधी महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
मुंबई लोकल सेवेची सद्यस्थिती-मध्य रेल्वे- २० ते २५ मिनिटं उशीरानंहार्बर रेल्वे- २५ मिनिटं उशीरानंपश्चिम रेल्वे- १० ते १५ मिनिटं उशीरानं