Local Ticket: लसवंतांना लोकलचे तिकीट; आतापर्यंत होती केवळ पास वितरणाचीच मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:21 AM2021-11-01T10:21:49+5:302021-11-01T10:22:14+5:30
Local Ticket for all Vaccinated: आता सर्व लसवंत आणि १४ दिवस पूर्ण झालेल्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाचे तिकीट वितरित करावे, असे पत्र आपत्ती व्यवस्थापन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकल प्रवास सुरू झाल्यापासून केवळ आपत्कालीन कर्मचाऱ्यांना मिळणारे रेल्वे प्रवासाचे तिकीट आता लसीकरण पूर्ण झालेल्या सर्व प्रवाशांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दैनंदिन तिकीट द्यावे, असे पत्र राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविले आहे.
आता सर्व लसवंत आणि १४ दिवस पूर्ण झालेल्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाचे तिकीट वितरित करावे, असे पत्र आपत्ती व्यवस्थापन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पाठविले आहे. यात तिकीट खिडकीवर पूर्वीप्रमाणे तिकीटही उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. लोकल तसेच पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा खुली करताना जी नियमावली आखून दिली आहे त्याचेही पालन केले जावे. त्यासाठी रेल्वेने आपली संबंधित यंत्रणा राबवावी, असेही सूचित करण्यात आले आहे. तर आतापर्यंत केवळ मासिक अथवा त्रैमासिक पास वितरणाचीच मुभा देण्यात आली होती. मात्र, या धोरणामुळे एकीकडे विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे कोविड नियमावलीचा हेतूच पायदळी तुडवला जात असल्याची बाब रेल्वे अधिकाऱ्यांनी राज्य सरकारसमोर मांडली होती.
त्रैमासिक, सहामाही पास मिळणार
-राज्य सरकारने दिलेल्या पत्रानंतर रेल्वे प्रशासनाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना रविवारी तिकीट देण्यास सुरुवात केली आहे.
-त्याबाबत सूचना रेल्वे प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता तिकीट खिडकीवर युनिव्हर्सल पास असणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पाससह आता दैनंदिन तिकीट मिळणार आहे.
लोकल तिकिटावरून रेल्वे स्थानकांवर गोंधळ
कोरोना लसचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झाले आहेत, अशा प्रवाशांना आता मुंबई उपनगरीय लोकलचे तिकीटही उपलब्ध करण्याबाबत शनिवारी राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले होते. मात्र रविवारी रेल्वे स्थानकांवर गोंधळ पाहायला मिळाला.
काही स्थानकांवर तिकीट दिले जात होते तर काही ठिकाणी परिपत्रक न मिळाल्याचे कारण देत तिकीट नाकारण्यात आले. राज्य सरकारकडे लोकलचे तिकीट देण्याबाबत पाठपुरावा केला होता. तिकीट सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल. मात्र आज अनेक रेल्वे स्थानकात परिपत्रक न मिळाल्याचे कारण देत तिकीट दिले नाही, अशी माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.
गर्भवती महिलांच्या प्रवासामध्ये विघ्न
राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्याना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागत आहे, पण नियमावलीमध्ये काही अटी आहेत त्यामुळे गर्भवती महिला ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांना प्रवास करण्यास अडचण येत आहे, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन यांनी सांगितले.