Join us

Mumbai Local Train Updates: मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 2:37 PM

Mumbai Local Train Updates: मुंबईमध्ये कोरोनाची घटती आकडेवारी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये सूट देण्याबाबतीत सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

मुंबई-

मुंबईमध्ये कोरोनाची (Corona In Mumbai) घटती आकडेवारी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये सूट देण्याबाबतीत सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मुंबईकरांची लाइफ लाइन असलेल्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) आता लसीकरणाला पात्र नसलेल्या १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट दिलं जाणार आहे. याशिवाय, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षावरील नागरिकांनाही मुंबई लोकलचं तिकीट दिलं जाणार आहे. याआधी लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी केवळ मासिक पास उपलब्ध करुन दिला जात होता. आता दोन्ही डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना रेल्वेचं तिकीटही मिळणार आहे. अर्थात प्रवाशांना तिकीट खिडकीवरुन तिकीट खरेदी करावं लागणार आहे. 

मुंबईची लोकल सेवा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबतची मागणी केली जात होती. त्यात २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय प्रकृती अस्वास्थामुळे ज्यांना कोरोना विरोधी लस घेण्याची परवानगी नाही अशा व्यक्तींना डॉक्टरच्या मेडिकल सर्टिफिकेट तिकीट खिडकीवर सादर करुन तिकीट घेता येणार आहे. 

महत्त्वाची बाब अशी की लोकल प्रवासाचं तिकीट केवळ तिकीट खिडकीवरुनच उपलब्ध केलं जाणार आहे. जेटीबीएस, एटीव्हीएम कुपन्स आणि यूटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.   

टॅग्स :मुंबई लोकलकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस