+ महेश चेमटेमुंबई : सलग ६० तास चालणाऱ्या नाट्य संमेलनातील नाट्य रसिकांसाठी मध्य रेल्वेदेखील सज्ज झाली आहे. रसिकांच्या सोईसाठी १३, १४ आणि १५ जून रोजी मध्यरात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नाट्य परिषदेच्या आयोजकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने ९८वे मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडणार आहे. कालिदास नाट्यगृहात सलग ६० तास कार्यक्रम होणार आहे. यात कोकणातील दशावतार ते विदर्भातील लोककला, नृत्य नाटिका ते एकांकिका, प्रात:स्वर ते संगीत बारी असे दर्जेदार कार्यक्रम असणार आहेत. कार्यालयातील कामकाज संपवून रात्री उशिरा सहकुटुंब नाट्य संमेलनाला हजेरी लावता यावी; यासाठी संमेलन कालावधीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी लोकल चालवण्याची विनंती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मध्य रेल्वेला केली होती. कांबळी यांच्या विनंतीवरून मध्य रेल्वेने ‘संमेलन विशेष लोकल’ चालविण्याचा निर्णय घेतला आहे.नाट्यरसिकांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने संमेलन काळात रात्री उशिरा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकलच्या वेळा, मार्ग मंगळवारी निश्चित होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
उत्तररात्रीच्या नाट्यरसिकांना झुकझुक गाडीची साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 7:08 AM