Join us

मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:03 AM

Mumbai Losabha Election Result: मुंबईतील सहा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असले, तरी खरी लढाई भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच आहे.

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकारणात जून २०२२ पासून विलक्षण नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचा पहिला निर्णायक क्षण मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप आणि शिंदेसेना यांचा समावेश असलेली महायुती आणि उद्धवसेना व काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी यांच्यात मुंबईचा बॉस कोण, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील सहा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असले, तरी खरी लढाई भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच आहे. मुंबईच्या एकूण ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदारांपैकी ५३ लाख ७३ हजार ४६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे आणि एकत्रित सेनेचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीच्या उमेदवारांनी भरपूर मते घेतली होती. ही युती राहिली नसली तरी वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघांत आणि एमआयएमने दोन मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचे उमेदवार कुठेही एकामेकांविरोधात नाहीत. 

राहुल शेवाळे की अनिल देसाई?

यावेळी भाजप मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्व या तीन जागा लढवत आहे. या तीनही जागा उपनगरांतील आहेत. शिंदेसेना उपनगरातील उत्तर पश्चिम आणि मुंबई शहरातील दक्षिण व दक्षिण मध्य या तीन जागा लढवत आहे. शिवसेनेचा जन्म आणि वाढ जिथे झाली त्या दादर आणि माहीम परिसराचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे राहुल शेवाळे आणि उद्धवसेनेचे अनिल देसाई हे चुरशीच्या सामन्यात नशीब आजमावत आहेत.

... यांची प्रतिष्ठा पणाला दक्षिण मुंबईत उद्धवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदेसेनेसोबत असलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. मुंबई उत्तर पश्चिम येथे उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेकडून आमदार रवींद्र वायकर हे एकमेकांविरोधात उभे आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची लढत मुंबई उत्तर येथे काँग्रेसचे भूषण पाटील यांच्याशी आहे. उत्तर पूर्व या मतदारसंघात भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांचा सामना उद्धवसेनेचे संजय दिना पाटील यांच्याशी आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघांतील मतदान निर्णायक

मुंबई दक्षिण :

१) मलबार हिल - २०१९ मध्ये येथून अरविंद सावंत यांना विक्रमी आघाडी होती. 

२)  भायखळा - येथे शिंदेसेनेच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार. 

३)  वरळी - आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ.मुंबई दक्षिण मध्य :

१)   माहीम - शिवसेनेचे मुख्यालय, शिवाजी पार्क आणि दादरचा परिसर याच मतदारसंघात.

२)   अणुशक्तीनगर व सायन कोळीवाडा - बहुभाषिक, बहुधर्मीय मतदारसंघ.

मुंबई उत्तर मध्य :

१)  विलेपार्ले - २०१९ मध्ये येथे भाजपाच्या पूनम महाजन यांना विक्रमी आघाडी.

२) चांदिवली - अल्पसंख्याक, उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांची संख्या लक्षणीय.

मुंबई उत्तर पश्चिम : 

१)  अंधेरी पूर्व - उद्धवसेनेच्या ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत मशाल चिन्हावर विजयी झाल्या.

२)  वर्सोवा - कोळी आणि इतर मिश्र वस्ती. 

३)  जोगेश्वरी - अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात. 

मुंबई उत्तर :

१)  बोरीवली, चारकोप - भाजपचे बालेकिल्ले.

२)  मालाड पश्चिम - अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण खूप.

मुंबई उत्तर पूर्व :

१)  मुलुंड व घाटकोपर पूर्व - भाजपचे बालेकिल्ले.

२)  विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम - मराठी मतदारांचे प्रमाण मोठे.

३)  शिवाजीनगर मानखुर्द - अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकालमुंबई