मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले आहे. असे असले तरी अजून ८० टक्के कर्मचारी पालिकेच्या सेवेत रुजूच झालेले नाहीत. पावसाळा सुरू झाल्यामुळे पालिकेवरील कामाचा भार वाढला आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखी अडचण निर्माण झाली आहे. जे कर्मचारी अजून सेवेत परतलेले नाहीत किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले नसल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या विविध खात्यांतील १० हजार ४०० कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात रुजू झाले होते. यापैकी काहींना त्याआधी मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामासाठी घेण्यात आले होते. २० मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. ४ जून रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. दरम्यान, २६ जूनला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या प्रक्रियेसाठी काही कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र ते पूर्ण वेळ नाहीत. आपले मूळ कार्यालय सांभाळून आठवड्यातील फक्त दोन दिवस त्यांनी निवडणुकीचे काम करणे अपेक्षित आहे.
आढावा घेण्याचे काम सुरू -
लोकसभा निवडणुकीच्या कामातील २० टक्केच कर्मचारी पालिकेत रुजू झाले आहेत. त्यामुळे सध्या पालिकेच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किती कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, त्यापैकी कितीजण अजून पालिकेत रुजू झाले नाहीत, याचा आढाव घेण्यात येत आहे. कार्यमुक्त केल्यानंतरही पालिकेत रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.