श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार
By सचिन लुंगसे | Published: May 17, 2024 07:32 PM2024-05-17T19:32:22+5:302024-05-17T19:32:48+5:30
Mumbai Lok Sabha Election 2024: गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी आणि दादर येथील श्रमिक बेघरांच्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेण्यात आल्यानंतर अनेक बेघरांना मतदार ओळखपत्र मिळाले असून, १४१ श्रमिक बेघर आयुष्यातील पहिल्यांदाच २० मे रोजी मतदान करणार आहेत.
मुंबई - गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी आणि दादर येथील श्रमिक बेघरांच्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेण्यात आल्यानंतर अनेक बेघरांना मतदार ओळखपत्र मिळाले असून, १४१ श्रमिक बेघर आयुष्यातील पहिल्यांदाच २० मे रोजी मतदान करणार आहेत. सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी संस्थेने या शेवटच्या घटकांपर्यंत मतदार नोंदणीचेसाठीचे सहकार्य केले होते.
राहण्यास घर नाही छत नाही, महापालिका वारंवार त्यांचे साहित्य जप्त करते ,पाणी आणि शौचालय या मूलभूत सुविधांपासून कोसो दूर श्रमिक बेघर आहेत. ते मतदार नसल्याने राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आणि विकासाच्या प्रक्रियेत नव्हते. यंदा निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदान नोंदणी अभियानामुळे अनेक श्रमिक बेघरांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे ते मतदार म्हणून भूमिका बजावणार असल्याचे सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान, आज हे श्रमिक बेघर हे रस्त्यावर, नाल्याच्या शेजारी, सिग्नलवर राहतात. त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांचे वास्तव्य नाकारले जाते. त्यामुळे श्रमिक बेघरांकरिता राष्ट्रीय शहरी आजीविका योजने अंतर्गत निवा-याची व्यवस्था, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
कुठे किती मतदार
एस व्ही रोड, गोरेगाव - २५
दत्तानी पार्क, कांदिवली - ४४
चिकू वाडी, बोरिवली - ४०
विलेपार्ले - १२
दादर - २०
एकूण - १४१