Join us  

मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 10:22 AM

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नाही.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नसल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेसप्रणित आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मनसे नेते राज ठाकरे हे भाजपविरोधात प्रचारासाठी आक्रमकपणे मैदानात उतरले होते. मात्र ‘लाव रे तो व्हिडीओ’ची जादू भाजपच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यास अपुरी पडली आणि काँग्रेसप्रणित आघाडीने मुंबईसह राज्यात चांगलीच आपटी खाल्ली. यंदाच्या निवडणुकीत मनसेने गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य सभा घेऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपप्रणित महायुतीची मुंबईसोबतच राज्यभर पीछेहाट झाल्याचे दिसून आले.

मनसे नेत्यांनी राखले अंतर-

काही ठिकाणी शिंदेसेना आणि मनसेच्या नेत्यांमधील धुसफुशीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होऊ शकले नाही. जिथे उद्धवसेनेचा उमेदवार आहे, तिथे मनसे नेते-कार्यकर्ते मनापासून प्रचारात उतरलेही नव्हते. काही भागांत मुस्लिम मतदार दुरावतील म्हणूनही मनसे नेत्यांनी महायुतीपासून अंतर राखले होते. त्यामुळे मुंबईत मनसेचा म्हणावा तितका फायदा महायुतीला झालेला दिसत नाही.

शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत उपस्थित राहून मनसे नेते राज ठाकरे यांनी मोदींना निवडून आणण्यासाठी भाषणही केले. परंतु, त्याच मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात मनसेचे इंजिन शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना वाचवू शकले नाही. २००९ मध्ये मनसे प्रथमच रिंगणात उतरली होती. त्यावेळी युतीची मते विभागली गेल्याने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात राम नाईक यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम निवडून आले होते. परंतु, यंदा उत्तर मुंबईत भाजपचे घटलेले मताधिक्य पाहता मनसे फॅक्टरचा प्रभाव फारसा पडला नाही.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४ निकाललोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मनसेराज ठाकरेनरेंद्र मोदीभाजपा