मुंबईत रोड शो, जाहीर सभा, निकालावर काय परिणाम? लोकसभा निवडणुकीत मैदान गाजविले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:03 AM2024-06-07T11:03:27+5:302024-06-07T11:05:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर या सभांचा मतदारसंघांत वेगवेगळा परिणाम झालेला दिसून आला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचारानिमित्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा, रोड शो झाले. राष्ट्रीय नेत्यांच्यासुद्धा सभा झाल्या आहेत. मात्र, निकालावर या सभांचा मतदारसंघांत वेगवेगळा परिणाम झालेला दिसून येतो.
महाविकास आघाडीच्या सभांचा मोठा परिणाम-
१) लोकसभा निवडणूक जाहीर होताच सर्वांत प्रथम आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेण्याचा सपाटा लावला होता.
२) आघाडीच्या नेत्यांनी कांजूरमार्ग, दादर, धारावी, जोगेश्वरी येथे रोड शो, रॅली सभा केल्या आहेत.
३) त्याचा मोठा परिणाम निकालावर दिसून आला. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होवूनही महायुतीला फारसे यश आलेले नाही.
बड्या नेत्यांशिवाय काँग्रेसने मिळविला मोठा विजय-
मुंबईत जाहीर प्रचार सभा घेऊनही भाजप किंवा महायुतीचा फारसा दबदबा पाहायला मिळाला नाही; कारण सहा मतदारसंघांपैकी केवळ दोनच मतदारसंघांत महायुतीला यश मिळाले. ज्या भागातून पंतप्रधान मोदींनी रोड शो केला तेथेदेखील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला. या उलट महाविकास आघाडीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मुंबईत जाहीर सभा न घेताही मोठा विजय मिळवला आहे.
महायुतीच्या नेत्यांचा फारसा दबदबा नाही-
१) महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या राष्ट्रीय नेत्यांचे रोड शो आणि जाहीर सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर येथे रोड शो झाला; तर कुर्ला येथे युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची जाहीर सभा झाली. महायुतीची शिवाजी पार्क येथे आणि महाविकास आघाडीची वांद्रे कुर्ला संकुल येथे जाहीर सभा झाली.
कोणाच्या किती सभा?
एकनाथ शिंदे : शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासून रोड शो, जाहीर सभा, मंडळ, सभांना भेटी दिल्या आहेत. मात्र, त्याचा मोठा परिणाम उद्धवसेनेची मते फोडण्यात झालेला दिसत नाही.
देवेंद्र फडणवीस : भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवली मतदारसंघात आणि कांजूरमार्ग येथे जाहीर सभा घेतल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम येथे जाणवला नाही. येथील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.
उद्धव ठाकरे : महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी भांडुप-विक्रोळी येथे संजय पाटील, जोगेश्वरीमध्ये अमोल कीर्तिकर, दादर, अभ्युदयनगर येथे अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यासाठी रोड शो आणि सभा घेतल्या.
शरद पवार : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही कांजूर, भांडुप येथील जाहीर सभेत मतदारांना आवाहन केले होते. त्याचा फायदा त्याच्या उमेदवारांना
झाला.