लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:17 AM2024-06-08T11:17:16+5:302024-06-08T11:19:37+5:30

Mumbai Lok Sabha Elections 2024 Result : लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात मुंबईतील काही मतदारसंघांत ‘कही खुशी, कशी गम’ असे चित्र पाहायला मिळाले.

mumbai lok sabha elections 2024 result candidate gets fewer votes in own residential areas in mumbai | लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात मुंबईतील काही मतदारसंघांत ‘कही खुशी, कशी गम’ असे चित्र पाहायला मिळाले. अनेक उमेदवार ते राहत असलेल्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले, तर काही उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली.

मुंबई उत्तर, पूर्व मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार आमदार मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत झाली. पाटील यांनी २९ हजार ८६१ मतांनी आघाडी घेत कोटेचा यांचा पराभव केला. तेथील सहा विधानसभांपैकी मुलुंडमधील रहिवासी असलेले कोटेचा यांनी एक लाख १६ हजार ४२९ मते घेत ६० हजार मतांची आघाडी मिळाली, तर भांडुपचे रहिवासी असलेले संजय दिना पाटील यांनी भांडुपमध्ये ७९ हजार ११७ मते घेत तीन हजार ४५८ मतांची आघाडी घेतली.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदेसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत रंगली. वायकर यांनी अवघ्या ४८ मतांच्या फरकाने कीर्तिकर यांचा पराभव केला. वायकर हे जोगेश्वरी पूर्वमध्ये राहतात, तर कीर्तिकर हे गोरेगावमध्ये राहतात. वायकर यांना जोगेश्वरीत ७२ हजार ११८ मते मिळाली, तर कीर्तिकर यांना गोरेगावमध्ये ७० हजार ५६२ मते मिळाली. दोघांनाही ते राहत असलेल्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते घेता आली नाहीत. जोगेश्वरीमध्ये कीर्तिकर आघाडीवर होते, तर गोरेगावमध्ये वायकर आघाडीवर होते.

१) मुंबई दक्षिणमध्ये उद्धव सेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ मतांनी आघाडी घेत पराभव केला. 

२) भायखळा येथील रहिवासी असलेल्या जाधव यांना तेथूनही आघाडी घेता आली नाही. जाधव यांना भायखळा येथून ४० हजार ८१७, तर सावंत यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ८६ हजार ८८३ मते मिळाली. 

३)  मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई यांचा विजय झाला. त्यांच्याविरुद्ध रिंगणात उतरलेले शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांना त्यांचे वास्तव्य असलेल्या अणुशक्तीनगर येथील मतदारसंघातूनही आघाडी घेता आलेली नाही. तेथे त्यांना ५० हजार ६८४ मते मिळाली. तर, उद्धव सेनेचे अनिल देसाई यांना ७९ हजार ७६७ मते मिळाली. 

Web Title: mumbai lok sabha elections 2024 result candidate gets fewer votes in own residential areas in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.