Join us

यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 4:01 PM

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

CM Eknath Shinde : मुंबईतल्या महायुतीच्या दोन महत्त्वाच्या जागांवर शिंदे गटाने यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्याने अखेर सस्पेंस संपला होता. मात्र यामिनी जाधव आणि वायकर यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांकडून शिवसेना आणि भाजपवर टीका करण्यात येत होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना तिकीट दिल्याचे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव, उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे घोटाळ्याचे आरोप असणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी देण्यात आल्याची टीका विरोधकांकडून होतेय. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा आता प्रचार करावा लागणार असे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या प्रकरणाचा मी अभ्यास केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

"यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी का देण्यात येऊ नये. त्यांना आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं आहे. आज जर त्यांच्यावर एखादी चौकशी लागली याचा अर्थ ते आरोपी नाहीत. मी त्यांची पूर्ण वस्तुस्थिती पाहिली आहे. त्यांच्या प्रकरणाचा मी पूर्णपणे अभ्यास केला आहे. खरोखर त्यांची चूक असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता. परंतु त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे. आज तुम्ही या लोकांवर आरोप करत आहात. पण कोव्हिडमध्ये तुम्ही लोकांच्या पोटावर मारलं. बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. कोव्हिड सेंटरमधून पैसे खाल्ले. पेशंट, डॉक्टर खोटे दाखवून पैसे खाल्ले," असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

दुसरीकडे रवींद्र वायकर यांनी जेलमध्ये जा किंवा सोबत असे दोनच पर्याय समोर असल्याचे म्हटलं होतं. मात्र त्यानंतर अडचणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्याचे म्हणत रवींद्र वायकर यांनी सारवासारव केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यामागे उभे राहिले नाहीत, असेही वायकर म्हणाले होते. याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"रवींद्र वायकरांनी खुलासा केला आहे. पक्षप्रमुख म्हणून त्यांना मानसिक आधार हवा होता. अशावेळी पाठीशी उभं राहणे कर्तव्य असतं. तुम्ही त्यांना खुशाल म्हणालात की, तुम्ही तुमचे बघा. तुमच्या परिवारावर आलं तरच तुम्ही बघता, हातपाय हालवता. कार्यकर्ता जेलमध्ये गेला तरी चालेल. मग कसले तुम्ही प्रमुख? माणूस अडचणीत असतो तेव्हाच त्याच्या मागे उभं राहायचं  असतं. हे करायला हिम्मत लागते. रवींद्र वायकरांना मी बोलवले नाही ते स्वतः आले आणि म्हणाले हे सगळं आहे. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम कोणी केले हे त्यांना समजले," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४एकनाथ शिंदेरवींद्र वायकरयामिनी जाधवशिवसेना