'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:22 PM2024-05-20T15:22:44+5:302024-05-20T16:04:09+5:30
Amol Kirtikar : मी अमोल किर्तीकरांना पाठिंबा दिला आहे असे स्पष्ट मत गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मांडले आहे.
Mumbai North West Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईसह राज्यातील १३ जागांवर मतदान पार पडत आहे. यामधल्या मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत. अमोल किर्तीकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांनी अमोल किर्तीकरांविरोधात प्रचार केला आहे. मात्र आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने आपण अमोल किर्तीकर यांच्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. गजानन किर्तीकरांना शिंदे गटात जाऊ नका असे सांगितले होते असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा असा अप्रत्यक्ष सामना पाहायला मिळाला होता. शिंदे गटात गेल्यामुळे गजानन किर्तीकरांनी अमोल किर्तीकरांविरोधात प्रचार केला. पण आता अमोल किर्तीकर यांना वडील गजानन किर्तीकर सोडून आईसह सर्व कुटुंबियांचा पाठिंबा असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गजानन किर्तीकर हे कुटुंबात एकटे पडले असल्याचे चित्र आहे. त्यातच मी सुद्धा अजित पवार यांच्यासारखाच कुटुंबात एकटा पडलो आहे, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे किर्तीकरांच्या पत्नीनेही गजानन किर्तीकरांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता.
काय म्हणाल्या गजानन किर्तीकराच्या पत्नी?
झी २४ ताससोबत बोलताना गजानन किर्तीकरांच्या पत्नीने याबाबत भाष्य केले. "मी अमोलला पाठिंबा दिला आहे. ते शिंदे गटात गेले ते मला आवडलं नाही. मी त्यांना (गजानन किर्तीकर) विरोध केला होता आणि सांगितले की हे बरोबर केले नाही. जे पटत नाही ते सांगायला काय भीती आहे. आम्हाला ते आवडलं नाही. तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकणार का? मला ते बरोबर वाटलं नाही. अर्थातच माझे मत अमोल किर्तीकर यांना आहे, असे गजानन किर्तीकर यांच्या पत्नी म्हणाल्या.