Join us

मुंबई-लंडन हवाई प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:05 AM

आजपासून मर्यादित विमानफेऱ्या सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडियाची मुंबई ते लंडन विमानसेवा शनिवार १ मेपासून सुरू ...

आजपासून मर्यादित विमानफेऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एअर इंडियाची मुंबई ते लंडन विमानसेवा शनिवार १ मेपासून सुरू होत आहे. यूके प्रशासनाने भारतीय प्रवाशांवर घातलेल्या निर्बंधांमुळे ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता मर्यादित विमानफेऱ्या होणार असल्यामुळे तिकिटांचे दर दुपटीहून अधिक वाढले आहेत.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सतर्क झालेल्या यूके प्रशासनाने भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घातली. त्यामुळे एअर इंडियाने २४ ते ३० एप्रिलपर्यंत भारत- यूके विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनास्थितीत सुधारणा झाल्यास १ मेपासून ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने भारत- यूके विमासेवा मर्यादित फेऱ्यांसह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एरवी मुंबई- लंडन प्रवासासाठी इकॉनॉमिक क्लासचे तिकीट ३० ते ३५ हजार रुपयांत मिळते. मात्र, या मर्यादित फेऱ्यांमुळे तिकीट दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. १ मे रोजी पहाटे उड्डाण घेणाऱ्या विमानाचे किमान तिकीट जवळपास ७१ हजार रुपयांना विकले गेले, तर सायंकाळच्या फेरीचे भाडे हे एक लाखाच्या घरात पोहोचले होते. मुंबई विमानतळावरून १, ४, ६, ८, ११, १३, १५ मे रोजी लंडनसाठी विमानांचे उड्डाण हाेईल. यशिवाय दिल्ली आणि बंगळुरू विमानतळावरूनही लंडनसाठी मर्यादित विमानसेवा सुरू राहणार असल्याचे एअर इंडियाने सांगितले. या सर्व विमानांचे तिकीट दर दुपटीने वाढले आहेत.

दरम्यान, भारतातून येणाऱ्यांवर यूके प्रशासनाने निर्बंध लागू केल्याने प्रवाशांनी प्रवास करण्याआधी नियमावली वाचून घ्यावी, तसेच कोरोना चाचणीचा अहवाल आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आधीच करावी. यूकेमध्ये पोहोचल्यानंतर एखाद्याला कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रवाशाची असेल, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले.

..............................................