Join us

अवघ्या ०.०४ टक्क्यांनी हुकली मुंबईच्या निकालाची शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:06 AM

मुंबईचा निकाल ९९.९६ टक्के, ३ लाख ४७ हजार विद्यार्थी उत्तीर्णलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या ...

मुंबईचा निकाल ९९.९६ टक्के, ३ लाख ४७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा यंदाचा मुंबई विभागाचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून, केवळ ०.०४ टक्क्यांनी मुंबईचा शत प्रतिशत निकाल हुकला आहे. आतापर्यंतच्या दहावी निकालाच्या वर्षांत सर्वाधिक निकाल यंदा लागला असून निकालात मागील वर्षीपेक्षा ३. ९४ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात मुंबई विभाग इतर चार विभागीय मंडळांसोबत तिसऱ्या स्थानावर असून, मागील वर्षीपेक्षा यंदा क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दरम्यान, यंदाचा निकाल हा सर्वस्वी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर अवलंबून आहे, तर दरवर्षीचा निकाल हा प्रत्यक्ष परीक्षा पद्धतीवर आधारित असतो. त्यामुळे यंदाच्या निकालाची तुलना ही मागील वर्षांच्या कोणत्याही निकालाशी होऊ शकत नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

रायगडचा निकाल ९९.९९

मुंबई विभागीय निकालात रायगड, ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर १, मुंबई उपनगर दोन यांचा समावेश होत असून, यंदाच्या निकालात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल मुंबई विभागात सर्वाधिक म्हणजे ९९.९९ टक्के लागला आहे. पालघर आणि मुंबई-१चा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९९.९६ टक्के, बृहन्मुबईची ९९.९६ टक्के आणि मुंबई-२ची निकालाची टक्केवारी ९९. ९७ टक्के अशी आहे.

जिल्हा - विद्यार्थी संख्या - उत्तीर्ण - टक्केवारी

ठाणे - ११४२८० - ११४२३७ - ९९. ९६

रायगड - ३४९४१ - ३४९३९ - ९९. ९९

पालघर - ५७४७१ - ५७४४२ - ९९. ९४

बृहन्मुंबई - ३१५६७ - ३१५५५ - ९९. ९६

मुंबई १ - ६१२१७ - ६११८६ - ९९. ९४

मुंबई २ - ४८१९१ - ४८१७८ - ९९. ९७

------------

राज्याप्रमाणेच मुंबई विभागातही मुलींची बाजी-मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९. ३५ टक्के

मुंबई विभागातून यंदा ३ लाख ४७ हजार ६६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुंबई विभागात ९९. १९ टक्के आहे तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९. ३५ टक्के आहे. यामुळे साहजिकच यंदाही राज्याप्रमाणेच मुंबई विभागात मुलींनीच बाजी मारली आहे. अनेक विद्यार्थिनींना लॉकडाऊनच्या काळात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षांत गुण कमी मिळाल्यास शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान दहावीच्या निकालात विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले असल्याने किमान त्यांचे पुढील शिक्षण चालू राहण्याची सकारात्मक आशा तरी असल्याचे मत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.

---

४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२ हजार ९१७

दरवर्षी विशेष प्राविण्यासह ७५ टक्के आणि आणि त्याहून किंवा ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. मात्र यंदा ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ७२ हजार ९१७ इतकी आहे. प्राविण्यासह विशेष श्रेणी व ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात मुंबई विभागात १ लाख १० हजार ९७९ हजार इतकी आहे. ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५९ हजार ८११ आहे तर ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८३० इतकी आहे.

-------

मागील ६ वर्षांची मुंबई विभागाची निकालाची टक्केवारी

२०१६- ९१. ९० %

२०१७- ९० . ०९%

२०१८- ९०. ४१ %

२०१९- ७७. ० ४%

२०२०- ९६. ७२%

२०२१- ९९. ९६%

------------------------------------------------------------------------------