मुंबईने हातातील विजेतेपद गमावले

By admin | Published: January 23, 2016 03:17 AM2016-01-23T03:17:59+5:302016-01-23T03:17:59+5:30

माधव कौशिक, रिंकू सिंग आणि शिवम चौधरी या त्रयीने केलेल्या निर्णायक शतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने १९ वर्षांखालील कूच बिहार

Mumbai lost the title of the title | मुंबईने हातातील विजेतेपद गमावले

मुंबईने हातातील विजेतेपद गमावले

Next

मुंबई : माधव कौशिक, रिंकू सिंग आणि शिवम चौधरी या त्रयीने केलेल्या निर्णायक शतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने १९ वर्षांखालील कूच बिहार स्पर्धेत यजमान मुंबईला ३ विकेट्सने नमवून शानदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या सिनिअर संघाने नुकताच मुंबईत बडोदाला नमवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे एकाच आठवड्यात दोन मुख्य स्पर्धा जिंकताना उत्तर प्रदेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली.
मुंबईतील कांदिवली येथे सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी ४४४ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले. मात्र संघाच्या तिन्ही प्रमुख फलंदाजांनी जबरदस्त शतकी तडाखा देताना उत्तर प्रदेशला लक्षवेधी विजेतेपद मिळवून दिले. माधवने पहिला बळी झटपट गेल्यानंतर शिवम चौधरीसह दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर रिंकूसह तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. माधवने ३०५ चेंडूंना सामोरे जाताना २० चौकार मारत १३६ धावा काढल्या, तर रिंकूने १०९ चेंडूंत १८ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचताना १३० धावांचा तडाखा दिला. शिवमनेदेखील शानदार शतकी खेळी करताना १३६ चेंडूंत १५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत १२१ धावा केल्या. मुंबईकडून झालेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा उत्तर प्रदेशने पुरेपूर घेतला.
मुंबईच्या मिनाद मांजरेकर, शम्स मुलानी, सिदक सिंग, ओंकार जाधव, अदीब उस्मानी आणि प्रिथ्वी शॉ यांनी प्रत्येकी एक बळी घेण्यात यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २८९ धावा उभारून उत्तर प्रदेशला २०५ धावांत रोखले आणि पहिल्या डावात ८४ धावांची आघाडी घेतली. या आघाडीचाही म्हणावा तसा फायदा घेण्यात मुंबईकर अपयशी ठरले. दुसऱ्या डावात रुद्र डी. (१२२) आणि ओंकार जाधव (१३०) यांनी शतकी खेळी केल्यानंतरही मुंबईला ३५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbai lost the title of the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.